मुंबई : घरातून मोठ्या उत्साहात मतदानासाठी बाहेर पडलेले मतदार तासंतास परतलेच नाहीत. मोबाइल जवळ नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्कही साधता येत नव्हता. परिणामी, मतदारांच्या नातेवाईकांची घालमेल सुरू झाली. काही नातेवाईकांनी तर थेट पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार करण्याची तयारीही केली. मात्र मतदान केंद्रातील रांगेत तासंतास खोळंबलेले मतदार तीन-चार तासानी घरी पोहोचले आणि अखेर त्यांच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघातील बहुतांश मतदान केंद्रांमध्ये अतिशय संथगतीने मतदान सुरू होते. मतदार प्रत्यक्ष मतदानासाठी आत गेल्यानंतर त्याच्या नावाची खातरजमा करून बोटाला शाही लावून झाल्यानंतर मतदान करीत होते. मतदान केल्यानंतर मतदान यंत्रातील संबंधित उमेदवाराला मत दिल्याची पावती पाहूनच मतदार मतदान केंद्रातून बाहेर पडत होते. एक मतदार मतदान खोलीतून बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या मतदाराला आतमध्ये प्रवेश देण्यात येत होता. त्यातच मध्येच ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी येत होते. ज्येष्ठ नागरिक येताच रांगेत उभ्या मतदारांना थांबविण्यात येत होते. ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने मतदानाची संधी देण्यात येत होती. त्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या मतदारांचा प्रचंड खोळंबा होत होता.

हेही वाचा…मुंबई : सेलिब्रिटींनी मोठ्या उत्साहात केले मतदान

मुंबईमधील बहुतांश भागातील मतदार मोठ्या उत्साहात सकाळीच मतदान केंद्रांवर मतदानासाठी पोहोचले. परंतु प्रशासकीय कामातील विलंबामुळे त्यांना रांगेत तिष्ठत उभे राहावे लागले. काही मतदारांना कार्यालयात जाण्याची घाई नव्हती. परंतु त्यांना घरातून कार्यालयाचे काम करायचे होते. अशा मतदान केंद्रावरील रांगेत खोळंबा झाल्याने प्रचंड अशा मतदारांचे कार्यालयीन काम रखडले. तसेच काही मतदार मतदान करण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले. परंतु दोन-तीन तास घरी परतलेच नाहीत. मतदान केंद्रामध्ये मोबाइलवर बंदी घातली होती. त्यामुळे मतदारांनी मोबाइल घरीच ठेवला होता. त्यामुळे मतदार आणि त्यांच्या नातेवाईकांचा संपर्कच होऊ शकला नाही. मतदानासाठी गेलेली घरातील व्यक्त बराच वेळ घरी न परतल्याने नातेवाईक अस्वस्थ झाले. अनेकांनी मतदान केंद्रात जावून मतदानास गेलेल्या कुटुंबातील सदस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा…मुंबई : कार्यकर्त्यांचा दिवस धावपळीत; परिचित मतदारांशी संवाद, ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य व खाण्यापिण्याची रेलचेल

मात्र मतदान केंद्रामध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य सापडत नव्हते. ही बाब तेथे उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात येत होती. परंतु मतदान केंद्रावरील गर्दीमुळे पोलिसही हतबल झाले होते. त्यामुळे मतदानासाठी गेलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांला कुठे शोधायचे असा पेच त्यांच्या नातेवाईकांना पडला होता. काही नातेवाईकांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार करण्याचा विचारही केला होता. मात्र तेवढ्यात मतदान केंद्रातील गर्दीतून बाहेर पडलेला त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना भेटला आणि नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बऱ्याच विलंबाने काही जण मतदान करून घरी पोहोचले आणि आपला शोध घेत असलेल्या नातेवाईकांशी मोबाइलवरून संपर्क साधला. असे प्रकार अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेल्या मतदारांच्या बाबतीत घडले. एकंदर ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना सोसावा लागला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voters face long queues and communication breakdown causing anxiety among relatives in mumbai lok sabha elections mumbai print news psg
Show comments