मागील गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ठाणे जिल्ह्य़ातील मतदानाची टक्केवारी ४९.४८ टक्के अशी जाहीर झाली होती. मात्र, आता अंतिम मोजणीत ही टक्केवारी वाढली असून त्यात दोन टक्क्य़ांची वाढ झाली आहे. ही वाढ क्षुल्लक वाटत असली तरी जिल्ह्य़ातील एकूण ७२ लाख ७० हजार ७४८ लाख मतदारांची तुलना करता अंतिम मोजणीत दीड लाख मते वाढली आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील एकूण चार लोकसभा मतदारसंघांमधून एकूण ३७ लाख ५८ हजार ३०२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे निकालाची भाकिते चुकण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात २४ एप्रिलला ठाण्यासह कल्याण, भिवंडी व पालघर या मतदारसंघांत मतदान झाले. त्याच दिवशी सायंकाळी या ठिकाणच्या एकंदर मतदानाची टक्केवारी निवडणूक विभागाने जाहीर केली. तीत जिल्ह्य़ातील ४९. ४८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता अंतिम मोजणीनुसार जिल्ह्य़ातील ५१. ७१ टक्के मतदारांनी मताचा हक्क बजावल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघातील उमेदवारांच्या निकालांत कमालीची चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय निरीक्षक मतदानाच्या विधानसभानिहाय टक्केवारीवर आधारीत निकालाची भाकिते वर्तवत असतात. मात्र, वाढलेल्या मतदानामुळे आता ते अंदाज चुकण्याची शक्यता आहे. जवळपास सर्वच विधानसभांची अंतिम मतदारसंख्या बदलली असली तरी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वाढ सर्वाधिक आहे. तर उल्हासनगराची टक्केवारी घटली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात आधी जाहीर झालेल्यापेक्षा आता सरासरी दोन ते तीन टक्क्य़ांनी मतदान कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.