लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात कायमस्वरूपी सुधारणा व्हावी यासाठी पी उत्तर विभागातील मार्वे मार्गावरील ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याने हाती घेतले आहे. त्याअंतर्गत सोमवार, २७ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून मंगळवार, २८ मे २०२४ रोजी रात्री १० वाजेपर्यंत जीर्ण जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. या कामानिमित्त २४ तासांसाठी जलवाहिनीचे अलगीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे २७ मे रोजी रात्री १० वाजेपासून २८ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंत पी उत्तर, आर दक्षिण आणि आर मध्य या विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी कृपया पाणी जपून व काटकसरीने वापरावे , असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

जलवाहिनी बदलण्याच्या कामअंतर्गत मार्वे मार्गावरील शिंदे गॅरेज ते ब्ल्यू हेवेन हॉटेल, मार्वे मार्ग, मालाड पश्चिम, पी उत्तर विभागापर्यन्त मार्वे रस्त्यालगत अस्तित्वात असलेली ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. मार्वे मार्गावरील शिंदे गॅरेज येथे ९०० मि.मी. बाय ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी जोडणी व जुनी ९०० मि.मी. जलवाहिनी खंडित करणे, मार्वे मार्ग व लगून मार्ग छेदिका येथे ९०० मि.मी. बाय ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी जोडणी व जुनी ९०० मि.मी. जलवाहिनी खंडित करणे, मार्वे मार्ग व अली तलाव मार्ग छेदिका येथे ४५० मि.मी. बाय ४५० मि.मी. व्यासाची जलवाहिनी जोडणी व जुनी ४५० मि.मी. जलवाहिनी खंडित करणे आणि मार्वे मार्ग ते ब्ल्यु हेवन हॉटेल समोर ९०० मि.मी. बाय ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम व जुनी ९०० मि.मी खंडित करणे आदी कामे केली जाणार आहेत.

आणखी वाचा-चर्चगेट – मरिन लाइन्सदरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक

या कामतानंतर भूमिगत गळतीचे प्रमाण कमी होऊन जलवाहिनीतील पाण्याचा दाब वाढण्यास मदत होणार आहे. एकंदरीतच मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार आहे.

या कामासाठी २४ तासांकरिता जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे. या कामादरम्यान पी उत्तर, आर दक्षिण व आर मध्य विभागातील खालील नमूद परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

आणखी वाचा-नालेसफाईत हलगर्जीपणा झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

१) पी उत्तर विभाग – अंबोजवाडी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ११.३० ते मध्यरात्रीनंतर १२.३५) २७ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

२) पी उत्तर- आजमी नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १२.०० ते मध्यरात्रीनंतर १.३०) – २८ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

३) पी उत्तर विभाग- जनकल्याण नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १.३० ते मध्यरात्रीनंतर ३.००) – २८ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

४) पी उत्तर विभाग- मालवणी (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ०८.०० ते सकाळी ११.५०) – २८ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

५) पी उत्तर विभाग- अली तलाव मार्ग, गावदेवी मार्ग, इनासवाडी, खारोडी, राठोडी गाव, मालवणी गाव, खारोडी गाव, मनोरी, पटेलवाडी, शंकरवाडी, मार्वे गाव, मढ क्षेत्र, मनोरी गाव (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ४.२० ते रात्री १०.०० ) – २८ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

६) आर दक्षिण विभाग- छत्रपती शिवाजी महाराज संकूल, न्यू म्हाडा ले आऊट (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ मध्यरात्रीनंतर ०१.३० ते मध्यरात्रीनंतर ३.००) – २८ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

७) आर मध्य विभाग- गोराई गाव, बोरिवली (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ०५.३० ते सायंकाळी ०७.३०) – २८ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.