लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. तसेच, संबंधित यंत्रणांना नाल्यात खडक लागेपर्यंत गाळ काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच पूर्ण केले जाईल. मात्र, या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिला. उचललेल्या गाळाची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याबाबतही यंत्रणांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका मुख्यालयात विविध प्राधिकरणांसमवेत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी उपरोक्त इशारा दिला. नाल्यात खडक लागेपर्यंत नालेसफाई केल्यामुळे नाल्यांची खोली वाढते. परिणामी, पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह योग्यरित्या होतो. असेही त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये, यासाठी मोठ्या नाल्यांचे मुख रुंद करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत. पूररोधक दरवाज्यांच्या सुस्थितीची पाहणी करणे, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मास्टिकचा वापर करणे, मुंबईतील संरक्षक भिंतींबाबत संबंधित प्राधिकरणांनी काळजी घेणे, भूमिगत साठवण टाक्या कार्यान्वित करणे आदी विविध सूचना बैठकीदरम्यान यंत्रणांना देण्यात आल्या.

आणखी वाचा-मुंबई : बेस्टची ॲप आधारित विमानतळ प्रीमियम सेवा बंद

यंदा सर्व प्राधिकरणाशी समन्वय साधत ‘झिरो कॅज्युअल्टी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत सर्व यंत्रणा आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडून कुठलीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची काळजी घेतील. सर्व यंत्रणांनी एकत्रित काम केल्यास कुठलाही अपघात होणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच, या सर्व यंत्रणांमधील समन्वयासाठी नोडल अधिकारी नेमण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.