पारशी पंचायतीची पालिकेच्या मदतीला धाव

मुंबई : मलबार हिलच्या दक्षिण दिशेच्या डोंगराचा भाग खचून झालेल्या दुर्घटनेनंतर तब्बल चार दिवस, चार रात्री जागून अथक मेहनतीने पालिकेच्या तब्बल ४०० कर्मचाऱ्यांनी सुमारे ७५० इमारतींचा खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे काम करून दाखविले. पालिकेच्या मदतीला पारशी पंचायत ट्रस्ट धावून आल्यामुळे हे शक्य झाले. परिणामी, पेडर रोड आणि आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठा सोमवारपासून पूर्ववत करण्यात पालिकेला यश आले.

बाबूलनाथ येथून पेडर रोडला जाणारा एन. एस. पाटकर आणि मलबार हिल येथून कमला नेहरू पार्कवरून पेडर रोडच्या दिशेला जाणाऱ्या बी. जी. खेर मार्गाच्या एका बाजूला बेस्टच्या कामासाठी चर खोदण्यात आला होता. बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसात डोंगरावरून पाण्याचा लोंढा आला आणि चर जलमय झाला. हळूहळू डोंगराखालची माती सरकू लागली आणि संरक्षक भिंत खचू लागली. पाण्याच्या तडाख्यात भूस्खलन झाले आणि मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. बी. जी. खेर मार्गाला मोठय़ा भेगा पडल्या. काही ठिकाणी रस्ता खचला.

मलबार हिल जलाशयातून येणाऱ्या मोठय़ा जलवाहिन्या बी. जी. खेर मार्गाखालून गेल्या आहेत. या जलवाहिन्यांमधून आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा करण्यात येतो. बी. जी. खेर मार्ग खचल्याने या जलवाहिन्यांचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. वाताहात झालेल्या रस्त्यावरील जलवाहिन्यांची दुरुस्ती करणे अशक्यप्राय होते. अशा कठीण प्रसंगी डोंगरवाडीमधील पारशी पंचायत ट्रस्ट पालिकेच्या मदतीला धावून आली. या ट्रस्टने आपल्या हद्दीतून जलवाहिनी टाकण्यास परवानगी दिली. मात्र डोंगरउतारावर असलेल्या डोंगरवाडीतून जलवाहिनी टाकणे मोठे आव्हान पालिकेला पेलावे लागले. बी. जी. खेर मार्गावरील तीन मोठय़ा जलवाहिन्यांऐवजी एक मोठी जलवाहिनी डोंगरवाडीतून केम्स कॉर्नर जंक्शनपर्यंत उतारावर टाकण्यात पालिकेचा जल विभाग यशस्वी झाला.

जलवाहिनी घसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आता त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. केम्स कॉर्नर जंक्शनपर्यंत आलेल्या जलवाहिनीला पुढे अन्य जलवाहिन्या जोडून या संपूर्ण परिसराचा पाणीपुरवठा सोमवारी पहाटे सुरू करण्यात आला. आता या एका जलवाहिनीवरच संपूर्ण विभागाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे निरनिराळ्या मार्गावरील पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक तयार करण्यात अधिकारी व्यस्त आहेत.

४०० जणांची अथक मेहनत

या भागाचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामात पालिकेच्या जल विभागाचा भायखळा येथील परिरक्षण विभाग, तातडीची दुरुस्ती विभाग, बांधकाम विभाग, ‘डी’ विभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी असे तब्बल ४०० जण चार दिवस, चार रात्री अथकपणे काम करीत होते. पालिकेचे जल अभियंता अजय राठोड यांच्या उपस्थितीत हे काम पूर्ण करण्यात आले. तर ‘डी’ विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी या कामात मोलाची मदत के ली. अभियंता प्रशांत बागवे, दुय्यम अभियंता संदेश खेडकर, प्रवीण जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन हे काम पूर्ण केले.

१०० हून अधिक टँकरच्या फेऱ्या

या भागातील ७५० इमारतींची तहान भागविण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर होते. मुंबईतील २४ विभाग कार्यालयांचे टँकर या भागात मागविण्यात आले. इमारतींना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतिदिन सुमारे १०० हून अधिक टँकरच्या फे ऱ्या झाल्या.