लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असतानाच ग्रामीण भागांमध्ये पाणीटंचाईने कहर केला आहे. एप्रिलच्या मध्यावरच राज्यातील पाच हजारांहून अधिक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. राज्यातील लहान-मोठ्या धरणांतील पाणीसाठा ३३ टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे.

मार्च महिन्यापासूनच कडक उन्हाळा सुरू झाला. अद्याप पावसाळा सुरू होण्यास सुमारे दोन महिन्यांचा कालावधी आहे. अशा स्थितीत राज्यात पाणीटंचाईचे भीषण चित्र निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या साप्ताहिक अहवालासानुसार सध्या राज्यातील ५ हजार ३१७ गावांना १९९७ टँकरमार्फत पाणीपुरवठा करावा लागत आहेत. मराठवाडा विभागात ही संख्या सर्वाधिक असून तेथील ८६८ गावे टंचाईग्रस्त आहेत. त्याखालोखाल खान्देशात व पश्चिम महाराष्ट्रात टँकरग्रस्त गावे आहेत. कोकण विभागात अद्याप फारशा झळा जाणवण्यास सुरुवात झालेली नाही. विदर्भात केवळ अमरावती विभागात ३७ टँकरद्वारे पुरवठा होत असून नागपूर विभागात अद्याप तशी गरज निर्माण झालेली नाही.

हेही वाचा >>> प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविण्यास सुरुवात; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेकडून कारवाई

दुसरीकडे राज्यातील धरणांची स्थितीही झपाट्याने बिघडत चालली आहे. राज्यातील लहान, मध्यम व मोठ्या अशा सर्वच धरणांमध्ये मिळून सरासरी ३३.३३ टक्के इतका पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा कमी म्हणजे केवळ १६.४९ टक्के इतकाच शिल्लक आहे.

धरणांची स्थिती

आकार संख्या पाणीसाठा (टक्के)

मोठे प्रकल्प १३८ ३२.४३

मध्यम प्रकल्प २६० ४०.२४

लघू प्रकल्प २,५९६ ३१.३४

एकूण २,९९४ ३३.३३