शिवसेना  खासदार संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य चुकीचंच होतं असं सांगत अशी वक्तव्यं यापुढे कुणाकडूनही खपवून घेतली जाणार नाहीत असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. महापुरुषांबद्दल असं कुणीही बोलू नये असंही थोरात म्हणाले. इंदिरा गांधी आणि करीम लाला भेटीसंदर्भात संजय राऊत यांनी एका जाहीर मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं. जे आज त्यांना मागे घ्यावं लागलं. कारण हे वक्तव्य केल्यापासून काँग्रेसचे सगळेच दिग्गज नाराज झाले होते. ही नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही मांडली असंही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत यांनी एका जाहीर कार्यक्रमात करीम लालाला भेटण्यासाठी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी येत असत असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला. काँग्रेस नेते हे संजय राऊत यांच्यावर कमालीचे नाराज झाले. ज्यानंतर १५ तारखेला म्हणजेच बुधवारी करण्यात आलेलं वक्तव्य आज संजय राऊत यांना मागे घ्यावं लागलं. ” मुंबईचा इतिहास ज्यांना ठाऊक नाही त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. माझ्या मनात इंदिरा गांधी, पंडित नेहरु आणि संपूर्ण गांधी घराण्याबाबत नितांत आदर आहे. प्रसारमाध्यमांनी ट्विस्ट करुन माझं वक्तव्य वापरलं. माझ्या मनात इंदिरा गांधी यांचा अनादार करावा अशी कोणतीही भावना नव्हती. तरीही कुणाला वाटत असेल की मी अनादर केला तर मी माझे वक्तव्य मागे घेतो ” असं म्हणत संजय राऊत यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं आहे.