काश्मीरमधील कलम ३७०चा प्रश्न निकाली लागला त्यानंतर आता इथं बिगर काश्मिरींना सरकारी आदेशानं जमिनी खरेदी करण्यास मुभाही मिळाली आहे. मात्र, अद्यापही श्रीनगरच्या चौकात भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्यास बंदी आहे. त्यामुळे इथं जर तिरंगा फडणार नसेल तर जमिनीचे तुकडे घेऊन करायचं काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील आपल्या रोखठोक या सदरातून केला आहे.

राऊत म्हणाले, “पाकिस्तान हा आपल्यासाठी देशातील निवडणुकांपुरता तोंडी लावण्याचा विषय बनला आहे. तर काश्मीर हा केवळ जमिनीचा तुकडा नाही तर त्यापेक्षाही बरंच काही आहे. ती हिंदुत्वाची आणि धर्माची भूमी आहे. मात्र, चारच दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडवण्यास गेलेल्या तरुणांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे जर तिथं तिरंगा फडकवता येत नसेल तर त्या जमिनीच्या तुकड्यांचा उपगोय काय?”

राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला तसाच काश्मीरची समस्याही कायमचीच संपायला हवी. आजवर भारतानं लढलेल्या चार युद्धांमध्ये जितका रक्तपात झाला नसेल तितका रक्तपात काश्मीरच्या भूमीवर झाला आहे. मोदी आणि शाह यांनी कलम ३७० आणि ३५ अ संपवलं. पण अजूनही काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत झालेली नाही. उलट तिथल्या लोकांवर, राजकीय हालचालींवर कडक निर्बंध आले. आजही काश्मीरमध्ये लष्कराच्या बंदुकांमुळेच शांतता आहे, असेही राऊत म्हणाले.

मेहबुबा मुफ्तींना अटक करुन अंदमानच्या तुरुंगात पाठवायला हवं

मेहबुबा मुफ्ती आणि त्यांचा पक्ष हा आझाद काश्मीरच्या बाजूने आहे. त्यामुळे त्यांनी काश्मीरमध्ये पुन्हा जोवर कलम ३७० लावले जात नाही तोपर्यंत काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू देणार नाही, अशी बेताल भाषा केली आहे. त्यांचा अपराध इतका भयंकर आहे की, त्यांना अटक करुन त्यांची रवानगी अंदमानच्या तुरुंगात करायला हवी. तसेच डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी तर ३७० कलमसाठी चीनची मदत घेण्याची भाषा केली, या दोन्ही अतिरेकी भूमिका आहेत.

काश्मीरी पंडितांची घरवापसी कधी होणार?

काश्मीर खोऱ्यातून ४०,००० पंडित आपला प्रदेश सोडून गेले. कलम ३७० हटवल्यानंतर या सर्वांची घरवापसी करु असा प्रपोगंडा केला गेला, तो चुकीचा आहे. कारण अद्याप एकही काश्मीर पंडित अद्याप खोऱ्यात परतू शकलेला नाही.