मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्याने आता प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने नवा प्रदेशाध्यक्ष नेमून त्याच्याकडे पक्षाच्या संघटनेची जबाबदारी सोपविली जाईल.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यावर रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची मुदत जानेवारी २०१९ मध्ये संपली असली तरी पक्षांतर्गत निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, प्रदेशाध्यक्ष दानवे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांना मुदतवाढ मिळाली.

दानवे यांना २०१४ मध्येही मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळाले होते. पण तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने दानवे यांची जानेवारी २०१५ मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आता देशात पुन्हा मोदी सरकार आल्यानंतर दानवे यांचा अनुभव व महाराष्ट्रातील राजकीयदृष्टय़ा प्रमुख मराठा समाजाची पाश्र्वभूमी यामुळे त्यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षाला नवीन नेता निवडावा लागेल. २०१५ मध्ये दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जवळपास दीड महिना दानवे यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्रिपद व प्रदेशाध्यक्षपद ही दोन्ही पदे होती. त्यानंतर त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा आताही आणखी काही महिने प्रदेशाध्यक्षपदी राहू शकतात.

आता भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांचीही केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून निवड झाल्याने भाजपला राष्ट्रीय अध्यक्षही निवडावा लागणार आहे. त्यामुळे या सर्व निवडणुका आता लवकरच होऊन नव्या नेतृत्वासह पक्ष विधानसभा निवडणुकीला सामोरे जातो की विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर नव्या नेमणुका होतात याबाबत भाजपमध्ये उत्सुकता आहे.

संघटनात्मक कौशल्याला संधी?

निवडणुकीतील विजयासाठी भाजपला आता प्रदेशाध्यक्ष म्हणून नावाजलेल्या चेहऱ्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चेहरे घेऊन महाराष्ट्रात भाजप विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल. पक्षयंत्रणा कार्यरत ठेवण्याची जबाबादारी नव्या प्रदेशाध्यक्षाला पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपद मिळू शकेल. मराठवाडय़ातील एकाचे नाव त्यासाठी चर्चेत आहे.