राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावे देणं योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेसकडून आक्षेप घेतला जात आहे.

या निर्णयानंतर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी देशाला नविन काही देणार की फक्त नाव बदलत राहणार? असा सवाल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना विचारला आहे. “भाजपाचे जितके प्रदेश आणि नेते आहेत त्यांनी नवीन काही केलेलंच नाही. यूपीएने आणलेल्या योजनांची नावं बदलणं एवढंच काम ते करत आहेत. नवीन शहरं निर्माण करत नाही. शहरांची फक्त नावं बदलली जात आहेत. देशाला नवीन काही देणार की नाही? की फक्त नाव बदलत राहणार. हेच त्यांचं धोरण आहे,” अशी टीका अस्लम शेख यांनी केली आहे.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ही या निर्णयावर आक्षेप घेत टीका केली आहे. “प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, जनतेची अशी मोठी मागणी आहे की अहमदाबादच्या नव्या स्डेडिअमला दिलेलं तुमचं नाव हटवून एखाद्या खेळाडूचं नाव तिथे दिलं जावं. खेळाडूंच्या सन्मानामध्ये देखील राजकीय डावपेच का?”, असं निरुपम म्हणाले आहेत. “हा निर्णय चुकीचा असून माझा त्याला विरोध आहे”, असं देखील संजय निरुपम यांनी म्हटले आहे.