मुंबई : बारा वर्षांपूर्वी केईएम रुग्णालयातील प्रसाधनगृहाच्या खिडकीतून आपल्या एक महिन्याच्या मुलीला फेकून तिची हत्या केल्याप्रकरणी दीपिका परमार (४२) या महिलेला सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रुग्णालयातून बाळ बेपत्ता झाल्याचा बनाव महिलेने केल्याने त्यावेळी रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला होता. त्या घटनेच्यावेळी आपली मानसिक स्थिती ठीक नव्हती, असा दावा या महिलेने केला होता. मात्र आपल्या जुळय़ा मुलांपैकी केवळ मुलीला घेऊन ही महिला रुग्णालयाच्या प्रसाधनगृहात गेली. त्यामुळे मुलीची हत्या करताना या महिलेची मानसिक स्थिती चांगली होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. घटनेच्या वेळी आरोपीची मानसिक स्थिती बिघडलेली असती तर ती जुळय़ा मुलालाही घेऊन रुग्णालयाच्या प्रसाधनगृहात गेली असती. परंतु तिने मुलीची हत्या करण्याच्या हेतूने तिला प्रसाधनगृहात नेले हे पोलिसांचे म्हणणे योग्य असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. सी डागा यांनी आदेशात नमूद केले. वैद्यकीय आणि अन्य खर्च टाळण्यासाठीच आरोपीने मुलीची हत्या केल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
आरोपीची २६ ऑक्टोबर २०१० रोजी वेळेपूर्वीच प्रसूती झाली. तिने जन्म दिलेल्या जुळय़ा मुलांना आरोग्य समस्या असल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपीने मुलीला रुग्णालयाच्या प्रसाधनगृहाच्या खिडकीतून फेकून दिले. मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र आरोपीने स्वत:ला वाचवण्यासाठी मुलगी बेपत्ता झाल्याचा दावा केला होता. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीने बनाव केला, त्यावरून त्यावेळी तिची मानसिक स्थिती ठीक असल्याचे आणि तिने काय केले हे तिला चांगलेच ठाऊक होते हे दिसून येते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी आरोपीला दोषी ठरवले होते. गुरुवारी न्यायालयाने तिला आपल्या एक महिन्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.