मेट्रो रेल्वे आजपासून सेवेत

मुंबई : सरसकट सर्व महिलांना लोकल रेल्वे प्रवासाची मुभा देण्याची सूचना राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला केली होती, परंतु आता प्रवासाची कार्यपद्धती ठरवण्यात येणार असल्याने महिलांना आणखी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागेल. मेट्रो रेल्वे सेवा मात्र आज, सोमवारपासून सुरू होत आहे.

मुंबई महानगरातील खासगी कार्यालयांसह सर्वच महिलांना १७ आक्टोबरपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्याची सूचना राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला केली होती. परंतु राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनात गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

रविवारी झालेल्या चर्चेत एकूण महिला प्रवाशांसह अन्य प्रवाशांचा अंदाज बांधणे आणि त्यानुसार नियोजन करणे गरजेचे असल्याचे रेल्वेने राज्य सरकारला सांगितले. त्यामुळे महिलांच्या प्रवासाबाबत कार्यपद्धती ठरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.  क्यूआर कोडशिवाय फक्त तिकिटावर प्रवासाची मुभा दिली, तर अत्यावश्यक सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना दिलेल्या ई-पासही रद्दबातल ठरतो. त्याचे काय असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे दोन दिवसांत यावर निर्णय होईल, असेही सांगण्यात आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सत्याकुमार यांनी राज्य सरकारशी चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होईल, असे सांगितले.

महामुंबई क्षेत्रातील सर्वच महिलांना १७ ऑक्टोबरपासून क्यूआर कोड ई-पासशिवाय तिकीटाच्या आधारे लोकल प्रवासाची परवानगी देण्याची सूचना राज्य सरकारने रेल्वेला पत्राद्वारे केली होती. मात्र वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे उपनगरीय लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे, शारीरीक अंतर आणि अन्य नियमांचे पालन करण्याबाबतचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले होते. तसेच सर्वच महिलांना तातडीने प्रवासमुभा देणे शक्य नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानंतर सलग दोन दिवस मध्य, पश्चिम रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरूआहे.