आजारपणाच्या कारणावरून घरचे जेवण, झोपण्यासाठी गादी-उशी, गार वाऱ्यासाठी पंखा आदी अन्य कैद्यांच्या नशिबी नसणाऱ्या ‘ऐषोआरामी’ सुविधा पदरात पाडून अभिनेता संजय दत्त मुंबई बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी झालेली शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात दाखल झाला. कारागृहात निदान महिनाभर तरी घरच्या जेवणाचा आस्वाद घेता येईल या आशेने तो काहीसा निश्चिंतही होता. मात्र आठवडय़ाभरातच कारागृह प्रशासनाने त्याच्या घरच्या जेवणावर आक्षेप नोंदवत त्याविरोधात न्यायालयातच धाव घेतली आहे. ‘टाडा’ न्यायालयासमोर शरणागती पत्करण्याआधी संजय दत्तने आजारपणाच्या कारणावरून कारागृहात अनेक सुविधा न्यायालयामार्फत मिळविल्या आहेत.  
अर्थात न्यायालयाने या सुविधा केवळ महिनाभरासाठी असून त्या पुढेही सुरू ठेवायच्या असतील तर कारागृह प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल, असेही बजावले होते. आर्थर रोड कारागृहात असेपर्यंत या सुविधांचा आनंद तो लुटत होता. परंतु प्रत्यक्ष शिक्षा भोगण्यासाठी येरवडा कारागृहात दाखल झाल्यानंतर मात्र एक-एक करून त्याला या सुविधांपासून वंचित होण्याची वेळ आली आहे.  येरवडा कारागृह प्रशासनाने त्याच्या घरच्या जेवणाला आक्षेप घेत त्याविरुद्ध सोमवारी ‘टाडा’ न्यायालयात धाव घेतली. कारागृह नियमावलीत कैद्यांना घरच्या जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाऊ शकत नाही, असा दावा करीत प्रशासनाने संजयला दिल्या जाणाऱ्या घरच्या जेवणाला आक्षेप घेतला आहे.  या अर्जावर लवकरच सुनावणीची शक्यता आहे.