“तुम्ही ट्विटरवर उत्तर देऊ शकत असाल तर इथंही देऊ शकता;” कोर्टाने नवाब मलिकांना फटकारले

ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

Nawab-Malik-10
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने मलिकांना मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आणि पुढील सुनावणी बुधवारी ठेवली आहे. या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना फटकारले आहे.

“नवाब मलिक तुम्ही उद्यापर्यंत तुमचे उत्तर दाखल करा. तुम्ही ट्विटरवर उत्तर देऊ शकत असाल तर तुम्ही इथेही (कोर्टात) उत्तर देऊ शकता,” असे न्यायमूर्ती जामदार म्हणाले. दरम्यान, कोर्टाने नवाब मलिक यांना तक्रारदार ज्ञानदेव वानखेडे यांच्याविरुद्ध आणखी कोणतेही विधान करण्यापासून रोखणारा कोणताही आदेश दिलेला नाही.

ज्ञानदेव वानखेडे यांची बाजू मांडणारे वकील अर्शद शेख यांनी न्यायालयाला सांगितले की, नवाब मलिक यांच्याकडून दररोज काही खोटे आणि बदनामीकारक विधान केले जात आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबीयांबद्दल आणखी बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत. “आज सकाळीच मलिक यांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीबद्दल एक ट्विट पोस्ट केले आहे. तसेच किमान या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत न्यायालयाने एकतर मलिक यांना ज्ञानदेव वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल विधाने करण्यापासून रोखावे,” अशी मागणी अर्शद शेख यांनी केली.

नवाब मलिक यांचे वकील अतुल दामले यांनी दाव्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागताना न्यायालयाला सांगितले की, “ज्ञानदेव वानखेडे आपल्या सज्ञान मुलांच्या वतीने बोलू शकत नाही आणि इतर व्यक्तींनी सोशल मीडियावर काय टिप्पणी केली आहे, याचा दोष मलिकांना देता येणार नाही.”

ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्या दाव्यात नवाब मलिक यांच्याकडून त्यांचा मुलगा समीर वानखेडे आणि कुटुंबाविरुद्ध पत्रकार परिषद आणि सोशल मीडियाद्वारे बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल सव्वा कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: You reply on twitter can reply here also court to minister nawab malik hrc

ताज्या बातम्या