करोना काळात नागपूरकरांना मोठा दिलासा

नागपूर : नागपूर महापालिकेकडे डॉक्टरांचा तुटवडा आहे. परंतु आता मेडिकल, मेयोतील पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांची परीक्षा दिलेले १८३ डॉक्टर त्यांना लवकरच मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या डॉक्टरांना  १ वर्ष वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून सेवा अनिवार्य आहे. परंतु महापालिका त्यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून तीन महिन्यांसाठी सेवेवर घेणार असल्याने त्यांचे एक वर्षांचे  नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महापालिकेला करोना काळात डॉक्टर मिळणार असल्याने  नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उपराजधानीत रोज दीड हजारावर नवीन करोनाबाधितांची भर पडत असून यापैकी १० टक्केच्या जवळपास बाधितांना ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. सध्या शहरात साडेतीन हजारच्या जवळपास रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयांत दाखल असून गंभीर रुग्णांनाही  खाटा मिळत नाही. महापालिकेकडून डॉक्टर नसल्याचे सांगण्यात येते. परंतु आता महापालिकेकडून मेडिकल (१४१ डॉक्टर), मेयोत (४२ डॉक्टर) ३१ ऑगस्टला पदव्युत्तर अंतिम वर्षांची लेखी तर ७ सप्टेंबपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा दिलेल्यांची नियुक्ती करण्याचे निश्चित झाले आहे.

या सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय आरोग्य अभियानातून महिन्याला १ लाख रुपये वेतन दिले जाणार आहे.

परंतु या विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात अधिव्याख्याताची सेवा करायची असल्यास भारतीय वैद्यकीय परिषदेच्या निकषाप्रमाणे १ वर्ष वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून सेवा केल्याचे तसेच १ वर्ष बंधपत्रानुसार सेवा केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु महापालिकेत या डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी म्हणून तीन महिन्याच्या कंत्राटावर घेतले जात आहे. त्यामुळे या डॉक्टरांना वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून पदनाम न मिळाल्यास त्यांचे एक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे मार्डच्या बॅनरखाली या डॉक्टरांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांसह वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी चर्चा केली.

करोना काळात

आम्ही महापालिकेत पूर्ण क्षमतेने सेवा द्यायला तयार आहोत. सोबत आम्हाला वेतनाबाबत काहीच आक्षेप नसून सेवा काळात आमचे पदनाम आमच्या करिअरसाठी वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून मिळायला हवे. त्याबाबत आम्ही महापालिका प्रशासनाला विनंती केली आहे. त्यांनी वैद्यकीय संचालकांशी संपर्क साधला आहे. लवकरच हा प्रश्न सुटण्याची आशा आहे.

– डॉ. शैलेश लुटे, पदव्युत्तर विद्यार्थी प्रतिनिधी, मेयो, नागपूर