भाजप युवा मोर्चाकडून रक्तदानाचे अवमूल्यन

महापालिका निवडणूक समोर असल्याने सतत चर्चेत राहण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न होणे हे काही नवीन नाही. परंतु भारतीय जनता युवा मोर्चाने प्रचार करण्यासाठी रक्तदानासारख्या उद्दात हेतूला गालबोट लावण्याचे काम केले आहे. नगरसेवक संदीश जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करणाऱ्याला निशुल्क हेल्मेट देण्याचे जाहीर केले. इंग्रजांच्या राजवटीतून मुक्ततेसाठी युवकांमध्ये स्फूलिंग जागवण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा’ असे आवाहन केले. हे घोषवाक्यही प्रचंड गाजले आणि महत्त्वाचे अधिष्ठान प्राप्त झाले. भारतीय जनता युवा मोर्चाने ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला हेल्मेट देतो’ असे जाहीर करून रक्तदानाचे अवमूल्यन केले.

नागपूर महापालिकेच्या पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष लागले आहेत. विरोधी पक्षांकडून मोर्चे, निदर्शने, धरणे आंदोलन सुरू आहे. तसेच आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. सत्तेत असल्याने भाजपला अशी आंदोलनाची सवय असली तरी ते करता येणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्याकडून विविध शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. भाजयुमोने नगरसेवक संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित उद्या, शनिवारी दक्षिण अंबाझरी मार्गावरील धांडे सभागृहात रक्तदान शिबीर आयोजित केले. या शिबिरात रक्तदान केल्यास हेल्मेट दिले जाईल, असे पोस्टर, बॅनरमधून आवाहन करण्यात आले आहे. देशाचा इतिहास आणि संस्कृती जपण्याचे शिवधनुष्य आपणच पेलवत असल्याचे पदोपदी भारण्याचे काम ज्या पक्षाकडून आणि त्यांच्या मातृसंस्थेकडून होत आहे, त्यांच्याकडून ज्यांना हेल्मेट खरेदी करणे शक्य नाही, त्या आर्थिक कमकुवत गटाचे सामाजिक ऋण फेडणारी ही अफलातून संकल्पना जन्माला आली आहे.  भाजपने विरोधी पक्षात असताना हेल्मेटच्या सक्तीला विरोध केला. यात आणखी विशेष म्हणजे विरोधी पक्षात असताना हेल्मेट सक्ती विरोधात कायदेभंग आंदोलन करण्याचा इशारा देणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. फडणवीस यांना त्यांच्या कायदेभंग आंदोलनाची आठवण विरोधकांनी करून दिली. त्यामुळे त्यांच्यावर हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढवली.  यामुळे त्यांना खरेच दुचाकी चालकांची सुरक्षा हवी आहे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

युवकांचे रक्तशोषण, काँग्रेसची टीका

सहाशे ते एक हजार रुपये किमतीचे हेल्मेट खरेदी करू न शकणारा समाजातील कोणता वर्ग आहे, त्या वर्गाला हेल्मेटचे प्रलोभन दाखवून रक्तदान करण्यास सांगण्यास हे एक प्रकारे रक्तशोषण करणे आहे. भाजपने नऊ वर्षांत महापालिकेची तिजोरी रिकामी केली आणि आता युवकांचे रक्तशोषण करण्याची योजना आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली