•    भन्ते डॉ. परमाह अनेक यांचे प्रतिपादन
  •   धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा ६३ वा वर्धापन दिन थाटात

 

गौतम बुद्धांनी जगाला दिलेला शांततेचा विचारच विद्यमान स्थितीतून जगाला सावरू शकतो. गौतम बुद्धांचा धम्म हा जगाच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण आहे. आजघडीला जगातील ज्या ज्या देशांनी त्यांचा विचार स्वीकारला ते सर्वच देश प्रगती करत आहे. त्यामुळे धम्माचा प्रत्येक बौद्ध अनुयायाने स्वीकार करावा, असे आवाहन भन्ते डॉ. परमाह अनेक यांनी मंगळवारी येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला दीक्षाभूमीवर धम्मक्रांती केली. बुद्धाचा धम्म विपरीत परिस्थितीतही मात करू शकतो. या धम्मातील नैतिकता आणि नीतिमत्ता बाबासाहेबांनी जोपासल्यामुळे ते पुढे गेले. माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो, हे डॉ. बाबासाहेबांनी दाखवून दिले, असे डॉ. अनेक म्हणाले.

तथागत गौतम बुद्धांचा धम्म जगभरात स्वीकारला गेला. ज्यांनी त्याचे पालन केले त्यांची प्रगती झाली, असे म्यानमारचे महाउपासक टेंग ग्यार थॅन हॅल म्हणाले. अध्यक्षीय भाषणातून भन्ते नागार्जून सुरई ससाई यांनी जगात शांतीसाठी बुद्धाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

प्रास्ताविक विलास गजघाटे यांनी केले. संचालन स्मारक समितीचे सदस्य एन.आर. सुटे यांनी केले. परिचय प्रा. अर्चना मेश्राम यांनी करून दिला. आभार अ‍ॅड. आनंद फुलझेले यांनी मानले. यावेळी दीक्षाभूमीवर देश-विदेशातून लाखो बौद्ध अनुयायांनी उपस्थिती लावली होती.