विभागीय चौकशीत दोषी आढळलेले, गुन्हे दाखल असणाऱ्यांची वर्णी

कुलगुरूंच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याची जशी विद्यापीठाच्या अभ्यासमंडळावर वर्णी लागली तशीच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले आणि विभागीय चौकशीतही दोषी आढळलेल्या प्राचार्याना सुद्धा कुलगुरूंनी अभ्यासमंडळावर नामनिर्देशित केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

लाखनीच्या राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित समर्थ महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थ्यांनीही प्राचार्य डॉ. संजय गोविंद पोहरकर यांच्या विरोधात आर्थिक अफरातफरी बाबत तक्रारी केल्या होत्या. पोहरकर यांच्या विरोधात लेखी तक्रारीच नव्हे तर संस्थेने विभागीय चौकशी देखील केली आहे आणि त्यात ते दोषी आढळले आहेत.

लाखनी येथील पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाने मुलींसाठी एक वसतिगृह संस्थेला देऊ केले होते.

मात्र, त्याठिकाणी एकही विद्यार्थिनी नाही. लग्न, स्वागत समारंभ, मेजवानीचे कार्यक्रम पोहरकर त्याठिकाणी आयोजित करतात आणि तो पैसाही स्वत:च वापरतात. अनेक तक्रारींमुळे त्यांच्यावर विभागीय चौकशी बसवून त्यांना प्राचार्य पदावरून निलंबित करण्यात आले होते. सध्या त्यांच्या विरोधात प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

गुन्हे दाखल असलेले, विभागीय चौकशीत दोषी आढळलेली व्यक्ती विद्यापीठाच्या प्राधिकरणावर नामनिर्देशित होऊ शकत नाही, असे विद्यापीठ कायद्यात नमूद आहे. तरीही कुलगुरूंनी त्यांचे नाव मराठी अभ्यासमंडळावर दिले कसे, असा प्रश्न संस्थेने उपस्थित केला आहे.

मुळात भांडारकर स्वत:ला अध्यक्ष म्हणतात तेच भ्रष्ट आहेत. खोटय़ा सह्य़ा करून ते कारभार करतात. संस्थेचे खोटे शिक्के आणि स्वाक्षरी केल्याने त्यांच्या विरोधात लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते मला ब्लॅकमेल करतात. मानसिक छळ करीत असतात. त्यामुळे मीच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. महाविद्यालयातील वातावरण त्यांनी बिघडून टाकले आहे. माझ्या विरुद्ध शिक्षकांना भडकवतात. उच्च शिक्षण संचालक आणि कुलगुरूंकडेही त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्यांना ताबडतोब अटक करायला हवी. मी चुकीचा असेल तर मला अटक करावी. महाविद्यालयासाठी मी खूप काही केले आहे. तोटय़ातून महाविद्यालय बाहेर काढले आहे.

डॉ. संजय पोहरकर, प्राचार्य, समर्थ महाविद्यालय, लाखनी

विद्यापीठाच्या अभ्यासमंडळावर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य नामनिर्देशित होत असतील तर अतिशय वाईट बाब आहे. कारण त्यांच्यासारखी भ्रष्ट व्यक्ती चुकूनही सापडणार नाही. केवळ संस्थेच्याच पैशांचे नव्हे तर विद्यार्थी व प्राध्यापकांच्या पैशाचाही त्यांनी अपहार केला आहे. त्यांना अभ्यासमंडळावर नामनिर्देशित केल्याने संस्था आणि महाविद्यालयाची बदनामी होईल. यासंदर्भात लवकरच एक निवेदन कुलगुरूंना देऊन त्यांचे नामनिर्देशन मागे घेण्याची मागणी करण्यात येईल. अनेक तक्रारी करून विद्यापीठाने अद्यापही अशा प्राचार्याच्या विरोधात काही कारवाई केली नाही, याचे आश्चर्य वाटते.

आल्हाद भांडारकर, अध्यक्ष, राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी