माध्यमांवरील चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका; करोनामुक्ताचा सल्ला

नागपूर : तुम्हाला करोनाचा संसर्ग झाला असेल तर बिलकूल घाबरू नका, तो जीवघेणा नाही, सकारात्मक, मानसिकदृष्टय़ा सक्षम राहणे हा त्यावरील रामबाण उपाय आहे, फक्त दूरचित्र  वाहिन्यांवरील करोनाच्या विषारी बातम्यांपासून सावध राहा, असा सल्ला करोनातून मुक्त झालेल्या एका रुग्णाने दिला.

मूळचे नागपूरचे पण औरंगाबादमध्ये सरकारी सेवेत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची ही करोना कहाणी आहे. करोना झाला असे कळल्यावर बाधित रुग्ण घाबरतात. वेगवेगळ्े विचार त्यांच्या मनात घर करतात. माध्यमांवर चोवीस तास आदळणाऱ्या चुकीच्या बातम्यांमुळे ते घाबरतातही. प्रत्यक्षात बाधित झाल्यापासून तर करोनामुक्त होईपर्यंत आलेल्या अनुभवातून करोना हा जीवघेणा नाहीच. अन्य विषाणू सारखाच हा एक विषाणू आहे. त्यातून रुग्ण ठणठणीत बरा होतो, असा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी, या हेतूने त्यांनी त्यांचे उपचारादरम्यानचे अनुभव लोकसत्ताला कळवले.

ते म्हणतात,  २३ जूनला ते नागपूरला आल्यावर ताप आला. दुसऱ्या दिवशी तपासणी केली असता करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. महापालिकेने एम्समध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. सर्व तयारीसह तेथे गेल्याने दडपण नव्हते, त्यामुळे झोपही येत होती. तेथील वातावरण नवखे होते. किट घालून कर्मचारी वावरत होते. जेवणासह इतरही सोयी सुविधा समाधानकारक होत्या.

बाधितांनी गरम पाणी प्यावे असा सल्ला दिला जातो. परंतु प्रत्येकाकडे गरम पाण्याची बाटली नसते. त्यामुळे तेथे गरम पाण्याचे यंत्र लावले तर योग्य होईल. दुसऱ्या दिवशीपासून सर्व तपासण्या योग्यपद्धतीने झाल्या. सर्वसामान्य असल्याने नर्स कोणाशी बोलत नव्हत्या. पण काही रुग्णांना ते रुचल नाही. आमच्याशी कोणी बोलत नाही, काय झाले ते सांगत नाही अशी तक्रार त्यांची होती. त्यामागचे कारण त्यांच्या मनात माध्यमांनी घालून दिलेली भीती. ठरल्याप्रमाणे औषोधोपचार केले जातात.

रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी ही औषध असतात. चारच दिवसांनी प्रकृतीत सुधारणा झाल्याचे जाणवले. पुस्तक वाचन आणि तत्सम कारणांमुळे वेळही जात होता. मानसिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी हे आवश्यक होते. फोनद्वारे आप्तस्वकीय मला उपचाराबाबत विचारत तेव्हा त्यांना होत असलेल्या उपचारावर विश्वास बसत नव्हता. इंजेक्शन नाही, सलाईन नाही, फक्त गोळ्या. हे कसे असा त्यांचा प्रतिसवाल असायचा. इतर रुग्णांच्याही मनात हाच प्रश्न येत असल्याचे त्यांच्या चर्चेतून कळत होते. मात्र करोनाची उपचार पद्धती हीच असल्याचे स्पष्ट झाले.

आता परतीच्या प्रवासाची वाट होती. दाखल झाल्यानंतरअकराव्या दिवशी सुटी होते असे सांगितले गेले होते. सुटी देण्यापूर्वी दुसरी चाचणी होते का असे विचारले असता त्याचे उत्तर नाही असे मिळाले. ते आश्चर्यकारक वाटले. अकराव्या दिवशी मला सुटी झाली त्यादिवशी मी अगदी ठणठणीत बरा झालेला होतो. आपण करोनाबाधित झाल्याने कुटुंबांना विलगीकरणात जावे लागले याची खंत होती. त्यांचे अहवाल नकारात्मक आल्यावर जीव भांडय़ात पडला.

थोडे आरोग्य सेतू बाबत

आरोग्य सेतू डाऊनलोड केला की करोनाबाधिताची माहिती मिळते असे सर्वत्र सांगितले जाते. मुळात यात आपण जी माहिती टाकू त्या आधारावरच तो निष्कर्ष काढतो. त्यावर कितपत विसंबून राहावे हा प्रश्नच आहे. एम्समधील करोनाबाधितांच्या दोन वॉर्डात ४० -५० बाधित रुग्ण असताना आरोग्य सेतू अ‍ॅपवर मात्र पाचशे मीटपर्यंत फक्त दोनच रुग्ण दाखवले जात होते. चौकशी केली असता किमान सहा बाधित रुग्णांकडे आरोग्य सेतू अ‍ॅप होता. यावरून या अ‍ॅपबाबत संभ्रम वाढला.

हे करा

सामाजिक अंतर ठेवा, मुखपट्टय़ांचा वापर करा, सार्वजनिक जागेवर जाणे टाळा, वैयक्तिक स्वच्छता पाळा.  पुढच्या काळात करोनासह जगायचे असल्याने अधिक काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.