यंदाच्या वर्षी पृथ्वीजवळ एकूण ५० लहानमोठे धूमकेतू येणार असून त्यापैकी अनेक धूमकेतू सूर्य प्रदक्षिणा करताना सूर्यावरच आदळतील. काही धूमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता काही खगोलतज्ज्ञांनी व्यक्त केली असली तरीही पृथ्वीला त्यापासून धोका नाही. मात्र, पुढील काळात मोठय़ा उल्कावर्षांवाची शक्यता आहे. यावर्षी येणाऱ्या ५० धूमकेतूंपैकी उ/201 वळ ठएडहकरए, C/201 UT NEOWISE, 45 P Honda-Mrkas-Pajdusakova, 2 P/Encke, 41 P/Tutle-Glakobini-Kresak, C/2015, V2(Jonson) हे केवळ ५ धूमकेतू आपल्याला साध्या डोळ्याने किंवा द्विनेत्रीने पहावयास मिळतील, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी दिली.

चालू वर्ष भारतीय खगोलप्रेमींसाठी फारसे उत्साहवर्धक नाही. कारण, यावर्षी खूप चांगली ग्रहणे आणि घडामोडी दिसणार नाहीत. मात्र, हौशी खगोलप्रेमींसाठी धूमकेतूंची मेजवानी राहणार आहे.

नवीन वर्षांत सूर्य व पृथ्वीजवळ एकूण ५० लहानमोठे धूमकेतू येणार असून त्यातील अनेक नियमित नसून ते सूर्यावर आदळतील. काही धूमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून जात असल्यामुळे काही वैज्ञानिकांनी ते पृथ्वीकडे येतील, असे भाकीत केले आहे. मात्र, तसे होणार नसल्याचे मत सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे. त्यातील ५ मोठे धूमकेतू हे पृथ्वीजवळून जाताना दिसणार आहेत. व्यावसायिक व हौशी खगोलप्रेमी ते दुर्बिणीने किंवा द्विनेत्रीने सहज पाहू शकतात आणि अभ्यास करू शकतात.

आपल्या सूर्यमालेत सुमारे २०० अब्ज धूमकेतू असावेत आणि त्यापैकी २०१६ पर्यंत केवळ ४००० धूमकेतूंचा शोध घेतला गेला. यावर्षी जे ५ धूमकेतू डोळ्याने किंवा द्विनेत्रीने दिसण्याचा अंदाज व्यक्त केला गेला त्यापैकी * धूमकेतू C/2016 UT हा या NEOWISE  या अवकाश निरीक्षण केंद्राने २१ ऑक्टोबर २०१६ मध्ये शोधून काढला. हा धूमकेतू यानंतर कित्येक हजार वर्षांने पुन्हा येईल. त्यामुळे कित्येक पिढय़ांना तो पुन्हा दिसणार नाही. हा धूमकेतू उत्तर गोलार्धातून उत्तर-पूर्व दिशेला पहाटे सूर्योदयापूर्वी दिसेल. १४-१५ जानेवारीला तो पृथ्वीजवळ येणार असून साध्या डोळ्याने दिसण्याची शक्यता आहे. * धूमकेतू 2P/Encke  हा दर तीन वर्षांने येतो. ७ टक्के तेजस्वी असलेला हा धूमकेतू २० फेब्रुवारीपासून द्विनेत्रीने शुक्र व मंगळ ग्रहाजवळ दिसू शकेल, पण तो १० मार्चला पृथ्वीजवळ येणार असल्यामुळे डोळ्याने दिसू शकेल. तो ६ टक्के तेजस्वी दिसेल. * धूमकेतू 45 P/Honda-Mrkas-Pajdusakova हा मार्चमध्ये उत्तर आकाशात ५ टक्के  तेजस्वी दिसेल. तो ३० मार्चला पृथ्वीजवळ येईल, पण त्याला मे महिन्यापर्यंत पाहता येईल. * 41/Tuttle-Giacobini-Kresak हा धूमकेतू मार्चमध्ये उत्तर आकाशात ५ टक्के तेजस्वी दिसेल. ३० मार्चला तो पृथ्वीजवळ असेल आणि ३० एप्रिलपर्यंत दिसेल. C/2015.V2(Jonson) हा धूमकेतू उत्तर गोलार्धातून सकाळी मे महिन्यात ६ टक्के तेजस्वी दिसेल. तो जूनमध्ये पृथ्वीजवळ येणार असल्यामुळे साध्या डोळ्याने दिसू शकेल.

२०१७ मधील अवकाशीय घटना

  • १ फेब्रुवारीला छायाकल्प चंद्रग्रहण युरोप, अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडातून दिसेल.
  • २६ फेब्रुवारीला कंकणाकृती सूर्यग्रहण अर्जेटिना, अमेरिका, अटलांटिक, आफ्रिका, अंटाक्र्टिका येथून दिसेल.
  • २ ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण अमेरिका, नॉर्वे, पॅसिफिक व अटलांटिक येथून दिसेल.
  • ७ ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण युरोप, आफिक्रा, आशिया आणि ऑस्ट्रेलिया येथून दिसेल. यासोबतच वर्षभर ग्रहांची युती, प्रतियुती व अनेक उल्कावर्षांव पाहायला मिळणार आहेत.