काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विदर्भ अनुशेषाचे गाढे अभ्यासक, स्वतंत्र विदर्भाचे खंदे समर्थक आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य अ‍ॅड. मधुकर उपाख्य मामा किंमतकर यांचे बुधवारी सकाळी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी १०.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या प्रश्नांचा अभ्यास असणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

रामटेकमध्ये १० ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या मधुकरराव किंमतकर यांचे प्राथमिक शिक्षण रामटेकला झाले. १९५५ मध्ये पुढील शिक्षणासाठी ते नागपूरला आले. नरेंद्र तिडके यांच्या आग्रहास्तव मॉडेल मिल कामगार चळवळीत सहभागी झाले. १९५८ मध्ये वकिलीचे शिक्षण घेतले आणि न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली सुरू केली. महाविद्यालयीन जीवनातच ते काँग्रेस सेवादलात सहभागी झाले होते. १९८० मध्ये त्यांनी काँग्रेसकडून रामटेकमधून विधानसभेची निवडणूक लढवली व विजयी झाले. १९८२ मध्ये बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. त्यानंतर वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे वित्त, नियोजन कामगार, विधि व न्याय या विभागाचा कार्यभार होता. राजकीय जीवनात त्यांनी सुरुवातीपासूनच विदर्भाच्या विकासावर लक्ष्य केंद्रित केले होते. सरकार या भागाकडे लक्ष देत नसल्याची त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी विदर्भातील आमदारांचा गट तयार केला. विधिमंडळात विदर्भाच्या अनुशेषाचा आवाज बुलंद केला. १९८५ च्या विधानसभा निवणुकीत ते पराभूत झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांची राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. १९९० पर्यंत या पदावर कार्यरत होते. १९९२ मध्ये म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. १९९२ ते ९८ या काळात विधान परिषद सदस्य होते. १९९४ मध्ये राज्यपालांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून ते या मंडळाचे तज्ज्ञ सदस्य म्हणून काम करीत होते. अलीकडेच त्यांना रामटेक भूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

आज अंत्यसंस्कार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य मधुकरराव किंमतकर यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी आठ वाजता नागपूरहून रामटेक येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्यानंतर अंबाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज त्यांच्या धंतोलीतील निवासस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेकांनी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले.

ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकलो -मुख्यमंत्री

माजी मंत्री आणि विदर्भाच्या सर्वागीण विकासासाठी पक्षरहित भूमिका घेत अनेकांना प्रेरणा देणारे ज्येष्ठ नेते मामा किंमतकर यांच्या निधनाने एका मार्गदर्शकाला मुकलो. विदर्भाच्या विकासासाठी सर्वपक्षीय आमदारांची एकजूट असावी, यासाठी ते नेहमी आग्रही असत. विदर्भाचे प्रश्न समजून घेण्यासाठी मी अनेकवेळा त्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन घेतले. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या प्रश्नांची आणि विकासाची जाण असलेला एक जाणता नेता हरवला, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले.