बाल्या गावंडे हत्याकांडातील फरार आरोपी

बहुचर्चित बाल्या गावंडे हत्याकांडातील आरोपी ‘डॉन’ संतोष आंबेकर हा गुरुवारी सकाळी ११.१५ च्या सुमारास प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना शरण आला. गेल्या वर्षभरापासून तो फरार होता. न्यायालयाने त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली असून कळमना पोलिसांना त्याची कोठडी घेण्याची मुभा दिली.

२२ जानेवारी २०१७ रोजीची ही खुनाची घटना आहे. बाल्या गावंडे हा आपला काटा काढेल, अशी भीती आंबेकरला होती. यातूनच त्याने बाल्याच्या हत्येची सुपारी योगेश कुंभारेला दिली. योगेशने शुभम व अन्य साथीदारांच्या मदतीने बाल्या गावंडे याच्या हत्येचा कट  रचला.  बाल्या ओळखीचा असल्याने त्याला सहजासहजी संशय येणार नव्हता. योगेशने बाल्याला २२ जानेवारीला कार्यक्रमासाठी कळमन्यातील तुकारामनगर येथील घरी बोलावले. तेथे त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह झुडुपी जंगलात फेकला होता. या प्रकरणात कळमना पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली होती. १० मे रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यात संतोष आंबेकर याचेही नाव होते. हत्याकांडानंतर मात्र संतोष पसार झाला. तेव्हापासून तो फरार होता. न्यायालयानेही फरार घोषित करून संतोषविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. या प्रकरणातील इतर आठ आरोपींची १२ डिसेंबरला सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली. त्यानंतर आंबेकर हा न्यायालयाला शरण येईल, अशी माहिती होती. आज गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता तो प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ओ. जैन यांना शरण आला. यावेळी त्याचे वकील आर. के. तिवारी सोबत होते. त्यानंतर न्यायालयाने कळमना पोलिसांना बोलवले. कळमना पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने आंबेकरची रवानगी न्यायालीन कोठडीत  केली व कळमना पोलिसांनी उद्या दस्तावेजासह आरोपीच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज करण्यास सांगितले.

पोलीस यंत्रणेचे अपयश

चौदा महिन्यांपासून आंबेकर फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून तो त्यांना सापडत नाही. त्यानंतर तो शहरात दाखल होऊन न्यायालयाला शरण येतो. याची कल्पनाही पोलिसांना नसते. मोठय़ा गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. मुन्ना यादवही सहा महिन्यांपासून फरार असून पोलीस त्याला तरी अटक करतील का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.