न्या. विकास सिरपूरकर यांचे प्रतिपादन

व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविण्याचा, लढा देण्याचा सर्वाना अधिकार आहे. मात्र, राज्यघटनेत घालून दिलेल्या लोकशाही मार्गानीच कोणताही विरोध व्हायला हवा. विरोध करीत असताना हिंसाचार होणार नाही, याची काळजी संबंधितांनी घेतली पाहिजे. नक्षलवाद्यांप्रमाणे आयसीस, तथाकथीत धर्मरक्षक किंवा गोरक्षक यांच्याकडून करण्यात येणारी हिंसा ही वाईटच असून त्यासंदर्भात आवाज उठविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.

भूमकाल या स्वयंसेवी संघटनेतर्फे शनिवारी राष्ट्रभाषा संकुलातील शेवाळकर सभागृहात ‘नक्षली हिंसाचार व माओवादाच्या शहरी कार्यपद्धतीचे आकलन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भूषविताना न्या. सिरपूरकर बोलत होते. नक्षलवाद म्हणजे व्यवस्थेविरुद्ध लढय़ाचा विचार आहे. मात्र, लोकशाही मार्गाने केलेला विरोध हा घटनेने मंजूर केला असून हिंसाचाराद्वारे होणारा विरोध हा घटनाबाह्य़ आहे. मात्र, नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग पत्करला. नक्षलवाद्यांचा हिंसाचार आणि कामकाजातील गुप्तता हे वाईट आहे. समाज हा ‘आहे रे’ व ‘नाही रे’ अशा गटांमध्ये विभागला गेला आहे. समाजातील विभागणी संपुष्टात येईपर्यंत एकमेकांवर होणारे अन्याय थांबविता येणार नाही. समाजातील विषमता आणि तफावतीमुळे लोकांमध्ये वैफल्य येते आणि त्यातून व्यवस्थेविरुद्ध मत तयार होते. अशा वैफल्यग्रस्तांना हेरून हिंसाचारासाठी तयार करण्याचे काम आता नक्षलवादी करीत आहेत. ही नक्षलवाद्यांची कार्यपद्धती चुकीची आहेत. त्याचप्रमाणे आयसीस, तथाकथीत धर्मरक्षक किंवा गोरक्षकांकडून होणारी हिंसा ही वाईटच असल्याचे मत न्या. सिरपूरकर यांनी यावेळी व्यक्त केले.