* १० लाखांत केवळ १ हृदय प्रत्यारोपण * प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे यांची माहिती

मेंदूमृत रुग्णाकडून होणाऱ्या अत्यल्प अवयवदानामुळे इटली, जर्मणीच्या तुलनेत भारतात ह्रदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी आहे. देशात प्रत्येक दहा लाखात केवळ १ ते २ शस्त्रक्रिया होतात, असे सुप्रसिद्ध ह्रदयप्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे यांनी सांगितले.

रविवारी नागपुरात कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या विदर्भ शाखेच्या पदग्रहण समारंभात डॉक्टरांशी संवाद साधतांना ते बोलत होते. डॉ. मुळे पुढे म्हणाले की, देशात प्रत्येक हजारात ८ नागरिक ह्रदयविकाराच्या धक्याने दगावतात. अनेकांना या आजाराची माहितीच नसते. अनेक रुग्णांवर ह्रदय प्रत्यारोपणाशिवाय पर्याय राहत नाही. त्यासाठी मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान होणे गरजेचे आहे. सध्या देशात प्रत्येक १० लाखामागे केवळ १ ते २ ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात. जर्मनीत ही संख्या ३२ तर इटलीमध्ये ३३ आहे. देशात केवळ १ टक्के मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान झाल्यास २,५०० रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणातून, १,२०० रुग्णांना ह्रदय प्रत्यारोपणातून, १,२०० रुग्णांना यकृत प्रत्यारोपणातून जीवदान मिळू शकते.  विदर्भ शाखेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. सुनील वाशीमकर म्हणाले की, वयाच्या पन्नासी खालील नागरिकांनाही ह्रदयविकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रुग्णांकरिता पहिले दोन तास खूप महत्वाचे असतात. याकाळात  त्यांच्यावर तज्ज्ञांकडून उपचार होणे गरजेचे असते. अनेकांना ह्रदय विकाराचा झटका आल्याचेही कळत नाही. त्यामुळे वेळीच औषधोपचार होत नसल्याने ४० ते ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. हे चित्र बदलण्याकरिता याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. संस्थेकडून १० मुलांच्या निशुल्क ह्रदयाच्या शस्त्रक्रिया करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. सुनील वाशीमकर, सचिव म्हणून डॉ. अनिल जवाहिरानी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पदांची सूत्रे स्वीकारली. डॉ. अझीज खान, डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ. निकुंज  पवार, डॉ. दास, डॉ.उदय माहोरकर, डॉ. प्रशांत जगताप याची भाषणे झाली.