मंगेश राऊत

सध्या मॅट्रीमोनिअल संस्थांचा (विवाह जोडणाऱ्या संस्था) महापूर आलेला आहे. यातल्या काही संस्थांनी वयस्क व श्रीमंत पुरुष हेरून त्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा नवा उद्योग सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आजच्या आधुनिक युगात तरुण-तरुणी उच्चशिक्षित व स्वावलंबी झाले आहेत. त्यामुळे दोघांचे विचार जुळणे आणि ते विवाह बंधनात अडकण्यासाठी पूर्वीच्या ३६ गुणांपेक्षा पैसा, घर, नोकरी आदी गुण जुळणेही महत्त्वाचे झाले आहेत. त्यामुळेच अनेक तरुण-तरुणींचे वय होऊनही विवाह करीत नाहीत. नंतर अनेकजण विवाह संस्थांचा पर्याय निवडतात. या संस्थांमधून वधू व वर सांगितले जातात. पहिले लग्न असो की विधूर, घटस्फोटी सर्वप्रकारचे तरुण-तरुणींचे यांच्याकडे पर्याय असतात. यातल्या काही बनावट संस्थांनी आता एक खोली भाडय़ाने घेऊन त्या ठिकाणी दोन संगणक व दोन मुलींना बसवून वधू-वरांची नोंदणी सुरू केली आहे. या संस्थांचे संचालक त्यांच्याकडे नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न बघून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याची योजना आखत आखत असल्याचे समोर आले आहे. उपराजधानीत असे तीन प्रकार उघडकीस आले आहेत. एका प्रकरणात मानकापूर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत, तर दोन प्रकरणाच्या तक्रारी थेट पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनाच प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींचा तपास सायबर सेलकडे देण्यात आल्याची माहिती आहे.

अशा लुटतात विवाह संस्था

गेल्या काही वर्षांमध्ये मध्यप्रदेश व जबलपूर परिसरातील काही संस्थांची नागपुरात कार्यालये सुरू झाली आहेत. पोलिसांकडे तक्रार प्राप्त झालेल्या संस्थांनी गर्भश्रीमंत विधूर पुरुष हेरून त्यांना विवाहासाठी योग्य मुलगी दाखवण्याचे आश्वासन दिले. त्यांना दोन ते तीन मुली भेटायला पाठवल्या. एक मुलगी त्यांना आवडली. त्या मुलीसोबत त्यांनी अनेकदा भेट घेतली. त्याचे छायाचित्र तरुणीने काढले आणि तेव्हापासून संबंधित पुरुषाला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार सुरू आहे. शिवाय नोंदणीसाठी मुला-मुलींकडून ४ ते १० हजार रुपयांपर्यंतचे वेगळे शुल्कही आकारण्यात येते ते वंगळेच.

अशा प्रकरणांवर नजर

विवाह नोंदणीच्या नावाने गोरखधंदा करणाऱ्या  संस्थांची माहिती गोळा करण्यात येईल. त्यांच्यावर नजर ठेवण्यात येईल. त्यांच्याकडून कुणाची लुबाडणूक होत असल्यास  पोलिसांकडे तक्रार करावी.  योग्य ती कारवाई करण्यात येईल.

– नीलेश भरणे, अतिरिक्त पोलीस आयुक्त