मेंदूमृत रुग्णाच्या अवयवातून तिघांना जीवदान

मेंदूमृत रुग्णाचे अवयव प्रत्यारोपण आतापर्यंत वेगवेळ्या ठिकाणी होत होते. आज प्रथमच न्यू ईरा रुग्णालयात यकृत आणि मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण एका रुग्णालयात करण्यात आले.

विजय बडवाईक (६४) रा. सोनेगाव असे मेंदूमृत रुग्णाचे नाव आहे. त्यांचा २३ ऑगस्टला अपघात झाला होता. त्यांना न्यूरॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर २६ ऑगस्टला लकडगंज येथील न्यू ईरा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांना  मेंदूमृत घोषित करण्यात आले. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवि वानखेडे यांना सूचित करण्यात आले.

समितीने नातेवाईकांना अवयवदानाचे आवाहन केले. सांगताच कुटुंबीयांनी त्याला होकार दिला. समितीने प्रतीक्षा सूचीनुसार न्यू ईरा रुग्णालयात उषा राणी या महिलेवर यकृताचे तर येथील नागेश अग्रवाल या रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली गेली. ज्या रुग्णालयात मेंदूमृत रुग्णाचे अवयव काढण्यात आले तेथेच इतर दोघांवर अवयव प्रत्यारोपणाची ही पहिलीच वेळ आहे, तर या रुग्णाचे दुसरे मूत्रपिंड वोक्हार्टच्या रुग्णात प्रत्यारोपित केले गेले. त्वचा ऑरेंज सिटी रुग्णालयातील त्वचापेढीला तर नेत्र माधन नेत्रपेढीला दान देण्यात आले. त्याचेही प्रत्यारोपण लवकरच होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेसाठी न्यू ईरा रुग्णालयातील डॉ. आनंद संचेती, डॉ. राहुल सक्सेना, डॉ. अग्रवाल यांच्यासह संपूर्ण डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

३८ यकृत, ६८ मूत्रपिंडाचे दान

उपराजधानीसह पूर्व विदर्भातील मेंदूमृत रुग्णांचे गेल्या पाच वर्षांमध्ये आजपर्यंत ३८ यकृत दान झाले आहेत. त्यापैकी १२ यकृत एकटय़ा नागपुरात प्रत्यारोपित झाले असून उर्वरित मुंबई, दिल्ली आणि चेन्नई येथे प्रत्यारोपित झाले आहे. त्यामुळे या रुग्णांना जीवदान मिळाले आहे. सोबत मेंदूमृत रुग्णांच्या मूत्रपिंडातून आजपर्यंत येथे ६८ जणांचे यशस्वी प्रत्यारोपण झाले आहे. राज्यातील इतर भागाच्या तुलनेत ही संख्या मोठी आहे.