वर्धा : नॅशनल मेडिकल कमिशन अर्थात राष्ट्रीय वैद्यक आयोगाने २०२४ – २५ या शैक्षणिक सत्रासाठी घेतलेला निर्णय या क्षेत्रासाठी खुशखबर देणारा ठरला आहे. पदव्युत्तर शाखेतील नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी तसेच या शाखेतील जागा वाढविण्यासाठी १५३ अर्ज मंजूर केले आहे. त्याचा लाभ ११० वैद्यकीय महाविद्यालयात नवे पीजी अभ्यासक्रम तसेच ४३ महाविद्यालयांत पीजी अभ्यासक्रमच्या जागा वाढविण्यास होणार आहे. येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललित वाघमारे यांनी यास दुजोरा दिला.
सध्या देशात एमबीबीएसच्या १ लाख ८ हजार ९९० जागा आहेत. तर पीजीच्या ६९ हजार ६९४ जागा आहेत. गत महिन्यात आयोगाच्या वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळाने १०१ अर्ज मंजूर केले होते. एम एस जनरल सर्जरी, एमएस ई एन टी, एमएस सायकीयाट्री, एमडी कम्युनिटी मेडिसिन, एमडी पॅथॉलॉजी, एमडी रेडिओ डायग्नोसिस यासह अन्य अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा – विदर्भात १५ ते २८ मे दरम्यान शून्य सावली दिवस
हेही वाचा – मोकाट श्वानांचा त्रास; व्यवस्थापनासाठी नागपूर महापालिका
२०२८ – २९ पर्यंत पीजी जागांची संख्या १ लाख ८ हजार ९९० पर्यंत वाढविण्याची योजना आहे. २०१३ – १४ मध्ये देशात ३८७ वैद्यकीय महाविद्यालये होती. ती संख्या आता ७०६ वर पोहोचली आहे. त्या अनुषंगाने एमबीबीएस केल्यावर पीजीच्या जागा वाढविण्यावर लक्ष केंद्रित केल्या जात आहे.