स्वतंत्र विदर्भाचा भाजपला विसर पडला आहे. त्यामुळे विदर्भात भाजपला विधानसभेत चांगलाच फटका बसला. केंद्रातील भाजप सरकारला आश्वासनाची आठवन व्हावी, येथील विजेचे दर निम्मे व्हावे, शेतकऱ्यांचे कर्जमाफ व्हावे, या मागणीसाठी पुढे चार टप्प्यात वेगवेगळे आंदोलन केले जाईल, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने अ‍ॅड. वामनराव चटप यांनी दिली.

टिळक पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत शनिवारी ते बोलत होते. समितीची बैठक १६ नोव्हेंबरला आमदार निवासात झाली. त्यात शिवसेनेसोबत भाजपची युती तुटल्याने आता भाजपला केंद्रात स्वतंत्र विदर्भ देण्यात अडचण नाही. विदर्भात वीज तयार होत असल्याने येथील विजेचे दर निम्मे कमी करण्याची स्थानिकांची मागणी आहे. येथील शेतकरी संकटात असल्याने त्यांचे कर्ज आणि जुने थकीत वीज देयक माफ करण्याची गरज आहे. यासह इतर मागण्यांसाठी पुढे चार टप्प्यात समितीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यासाठी ५०० कार्यकर्ते प्रशिक्षीत करून समितीची बांधणी मजबूत केली जाणार असल्याचे चटप यांनी सांगितले.

राम नेवले म्हणाले की, बैठकीत २ डिसेंबरला सेवाग्राम येथे एक दिवसांचे सामुहिक उपोषण करून महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला साकडे घातले जाईल. त्यात भाजपच्या नेत्यांना विदर्भासाठी सद्बुद्धी दे आंदोलन, २४ डिसेंबरला जिल्हा व तालुका स्तरावर १ दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन, जानेवारीच्या वेगवेगळ्या तारखेत विदर्भाच्या विविध ठिकाणी विजेचे दर निम्मे करा म्हणून धरणे, १५ फेब्रुवारीला विदर्भात सर्वत्र रस्ता रोको, २५ फेब्रुवारीला नागपूरला रेल रोको, १ मे रोजी विदर्भ बंद आंदोलन केले जाईल. विदर्भ- मिशन- २०२३ नुसार हे आंदोलन करणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.