|| महेश बोकडे

हजेरी ‘आरटीओ’त; ऑनलाईन परीक्षा इंटरनेट कॅफेत! : – नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) शिकाऊ परवाना घोटाळ्यातील नवनवीन प्रकरणे आता पुढे येत आहेत. त्यानुसार अनेक उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी शहर आरटीओ कार्यालयात तर ऑनलाईन परीक्षा नियमबाह्य़रित्या खरे टाऊनच्या एका खासगी इंटरनेट कॅफेत झाल्याचे पुढे येत आहे. ही माहिती कळल्यावर परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

नागपूरसह राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयात दलाल संस्कृतीमुळे भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नेहमी होत असतो. त्यामुळे पारदर्शी कामाच्या नावाने परिवहन खात्याने सर्व आरटीओ कार्यालयांत माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवत शिकाऊ परवान्याच्या  अपॉईंटमेंटपासून शुल्क भरण्यापर्यंतचे काम ऑनलाईन पद्धतीने सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिकाऊ परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊन निश्चित तारखेला  बायोमेट्रिक हजेरी व ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते.

ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवाराला वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना मिळतो. या ऑनलाईन परीक्षेसाठी संबंधित आरटीओ कार्यालयात संगणक असलेल्या लॅब उपलब्ध करण्यात आल्या आहेत. परंतु शहर आरटीओ कार्यालयांत २०१७ मध्ये सुमारे २५० उमेदवारांना शिकाऊ परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात बोलावले गेले.  बायोमेट्रिक हजेरी येथे घेतल्यावर त्यांच्या परीक्षा मात्र खरे टाऊनच्या ऑरेंज इनफोटेक प्रा. लिमी. या इंटरनेट कॅफेत घेण्यात आल्या. त्यासाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संजीवनी चोपडे यांच्या संगणकीय आयडीचा वापर केला गेला. चोपडेंच्या आयडीतूनच उमेदवारांचा ओटीपी क्रमांक निर्माण झाला. ते वापरूनच खासगी इंटरनेट कॅफेत उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षा झाल्या. त्यामुळे या माहितीच्या आधारेच पूर्वी नागपूरच्या शहर व आता गोंदियात कार्यरत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक  चोपडे यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती आरटीओच्या अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दिली. या प्रकरणात एकूण सतरा जणांवर गुन्हे दाखल असून त्यात बऱ्याच दलालांचाही समावेश आहे. पैकी काही दलालांना अटकही झाली होती. पहिल्या आरटीओ अधिकाऱ्याला अटक झाली आहे. आता इतरांवरही कारवाईची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.