अण्णा टोळीचे कृत्य; आयकर विभागाच्या सहायक आयुक्तांचीही गाडी फोडली

गेल्या काही दिवसांपासून गाडी फोडून पैसे लुटण्याच्या अनेक घटना समोर आल्या असून बुधवारी दक्षिण भारतातील अण्णा टोळीने शहरातील विविध भागात केवळ पाच तासात कार फोडून लाखो रुपये रोख व इतर मुद्देमाल  पळवला. या घटना सीताबर्डी, बजाजनगर परिसरात उघडकीस आल्या असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. यात एका आयकर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या कारचा समावेश आहे.

शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा आकडेवारीवरून पोलीस करीत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्य भयभीत झाले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजारात गर्दी आहे. त्याचा फायदा घेऊन लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत.

रामदासपेठ

पहिली घटना दुपारी दोन वाजताच्या सुमारास रामदासपेठेतील अंजनी आय हॉस्पिटल परिसरात घडली. डेंझिल रॉबिन फ्रान्सीस ( ३२) रा. बेलीशॉप निवासी संकुल यांनी त्यांची कार रुग्णालय परिसरात उभी केली. त्यावेळी एक तरुण त्यांच्याजवळ आला व पैसे पडल्याचे सांगितले. डेंझिल हा पैसे उचलत असतानाच अन्य एका चोरटय़ाने कारमधली लॅपटॉप असलेली बॅग पळवली.

बजाजनगर

दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास बजाजनगरमधील राम मेडिकलसमोर घडली. अंबुली विवेक पाठक (५०)  रा. लक्ष्मीनगर  या कारने औषध खरेदी साठी आल्या. दुकानात गर्दी असल्याने त्या परत कारमध्ये येऊन बसल्या. त्यादरम्यान एक युवक त्यांच्याजवळ  आला व पैसे पडल्याचे सांगितले. अंबुली या खाली उतरल्या. चोराने सोन्याचे दागिने, रोख व भ्रमणध्वनी असे एकूण एक लाखाचे साहित्य असलेली बॅग लंपास केली.

रामदासपेठ

चौधी घटना रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटसमोर घडली. आयकर विभागाचे सहायक आयुक्त आवेश आनंद तितरमारे (३०) रा. कीर्तीनगर  हे कार्यक्रमासाठी कारने हॉटेलमध्ये आले. चालकाला कार वाहनतळाच्या ठिकाणी उभी करायला सांगितले. चोरटय़ाने कारमधील लॅपटॉप, रोख व दस्तऐवज असलेली ८१ हजारांची बॅग लंपास केल्याचे सांगितले.

लक्ष्मीभवन चौक

अंबाझरीतील लक्ष्मीभवन चौक येथे सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली. डॉ. अमित विजय घाटगे (४१) रा. ओंकारनगर यांनी लक्ष्मीभवन चौकात कार उभी केली. चोरटय़ाने दरवाजाची काच फोडून लॅपटॉप व मोबाईल असे दोन लाख २० हजार रुपये किमतीचे साहित्य असलेली बॅग चोरी केली व क्षणात पसार झाला.

बिगबाजार परिसर

पाचवी घटना बिगबाजार समोरील पार्किंगमध्ये घडली. पैसे पडल्याचे सांगून चोराने छिंदवाडा येथील हर्षिद मसिद यांच्या कारमधून दागिने व मोबाईल असलेली बॅग चोरी केली. पाचही प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनांनी शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

या सर्व घटनांमध्ये दक्षिण भारतातील अण्णा टोळी आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे सर्व कैद झाले आहे. गुन्हे शाखा पोलीस आरोपीच्या मागावर असून लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल.   – संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.