हरियाणातील २६ गावातील वृद्धांवर अभ्यास; डॉ. नीलेश अग्रवाल यांचे आयुर्मानावर संशोधन
वयाची साठी गाठल्यानंतर अपंगांच्या विविध संवर्गापैकी बधिर असलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. नागपूरच्या डॉ. नीलेश अग्रवाल यांनी दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये असताना हरियाणातील २६ गावांतील वृद्धांवर हा अभ्यास केल्यावर ही धक्कादायक माहिती पुढे आली. भारतात प्रथमच झालेल्या या अभ्यासाची नोंद इंडियन जनरल ऑफ कम्युनिटी मेडिसीनमध्ये झाली आहे, हे विशेष.
नागपूरकर असलेले डॉ. नीलेश अग्रवाल यांनी दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये असताना केलेल्या संशोधनाकरिता अंध, बधिर, अंध आणि बधिर, सामान्य गटातील वृद्ध असे चार वेगवेगळे गट तयार केले. ६० ते ६९ या वयोगटातील हे सगळे वृद्ध हरियाणातील २८ गावांतून निवडले गेले होते. संशोधनाकरिता या गावांतील १,४२२ वृद्धांची विविध वैद्यकीय तपासणी करून रक्तासह इतर नमुने तपासले गेले. चारही गटातील या वृद्धांची वैद्यकीय तपासणी केली गेली. त्यात एकूण वृद्धांतील २४० जणांना रक्तदाब, आयुष्यात किमान एकदा पक्षाघात झटका, एकदा हृदयविकाराचा झटका, हाडांचा आजार, शुगर पैकी एक आजार असल्याचे पुढे आले.
सर्वाधिक १४० जणांना रक्तदाब, तर ९४ जणांना मधुमेह असल्याचेही वैद्यकीय तपासणीत पुढे आले. १२ जणांना पक्षाघात, १२ जणांना हृदयविकाराचा झटका, ९ जणांना हाडांचा आजार असल्याची बाबही त्यातून पुढे आली. त्यानंतर ५१८ दिवसांनी पुन्हा या वृद्धांची संशोधनाचा भाग म्हणून माहिती घेण्याचा प्रयत्न केला गेला. याप्रसंगी त्यातील तब्बल १०० वृद्धांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. मृत्यू झालेल्यांमध्ये आजार असलेल्या वृद्धांचा मृत्यू आजाराने संभावत असल्याने त्यांना अभ्यासातून वगळण्यात आले. शिल्लकपैकी मृत्यू असणाऱ्या प्रत्येक वृद्धाच्या घरी जाऊन त्यांच्या मृत्यूचे कारण कुटुंबीयांकडून जाणून घेण्यात आले. या अभ्यासात सर्वाधिक मृत्यू हे बधिर संवर्गातील वृद्धांचे (२२ मृत्यू) झाल्याची माहिती पुढे आली.अंधत्व असलेल्या ९ जणांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. अंधत्व व बधिर असे दोन्ही आजार असलेल्या ६ जणांचे मृत्यू झाले, तर पूर्णपणे सामान्य असलेल्या ६३ जणांचे मृत्यू नोंदवले गेले. मृतात सामान्य संवर्गातील वृद्धांची संख्या जास्त असल्याने त्यांची मृत्यू संख्या जास्त आहे, परंतु टक्केवारीने हे मृत्यू तपासले तर सर्वाधिक मृत्यू हे बधिर गटातील वृद्धांचे आहेत. संशोधनाकरिता वृद्धांची एकदा वैद्यकीय तपासणी झाल्यावर तब्बल ५१८ दिवसांनी प्रत्येक मृताच्या घरी जाऊन प्रत्यक्ष माहिती घेण्याचे हे देशातील पहिलेच संशोधन आहे. या संशोधनाचा अहवाल केंद्र सरकारलाही सादर केला गेला होता.

मृत्यूचे कारण शोधण्याची गरज -डॉ. नीलेश अग्रवाल
‘एम्स’मध्ये असताना हरियाणातील २८ गावांत आयुर्मानावरील अभ्यासात बधिर गटातील वृद्धांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे पुढे आले होते. हा अभ्यास देशाच्या जवळपास सगळ्याच भागात लागू होतो. या अभ्यासाची प्रत केंद्राच्या आरोग्य विभागाला भविष्यातील वृद्धांच्या आरोग्यावरील धोरण निश्चित करण्यात मदत व्हावी म्हणून दिली होती. या अभ्यासावरून मृत्यूचे कारण शोधण्याकरिता आणखी अभ्यास होण्याची गरज आहे. त्यात या रुग्णांच्या शरीरातील केमिकल तपासणी व्हायला हवी. सोबत देशात मोठय़ा प्रमाणावर वृद्धांच्या आजाराचे स्क्रिनिंगही गरजेचे आहे. त्यात यश आल्यास हे मृत्यू कमी करण्याचे प्रयत्न शक्य होईल, असे मत डॉ. नीलेश अग्रवाल यांनी दिले.

महत्त्वाच्या बाबी
* बधिरांमध्ये वयाच्या सत्तरीनंतर मृत्यूची जोखीम जास्त
* भारतात नागरिकांमध्ये आयुर्मान वाढत आहे
* मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त
* अपंगत्वासह आजारामुळे मृत्यूचा टक्का जास्त

निरीक्षणातील माहिती
संवर्ग                     नमुने           मृत्यू
बधिर                      १७४            २२
अंधत्व                       ८८             ९
दोन्ही                         ३६            ६
सामान्य                  १११४            ६३
एकूण                     १४२२            १००