पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली

नागपूर : नायलॉन मांजामुळे शहरात मोठय़ा प्रमाणात अपघात होत असून या महिन्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मध्यरात्री शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत नायलॉन मांजाची विक्री  व वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले.

उपराजधानीत गेल्या १० दिवसांत पतंगाच्या नादामुळे तीन बळी गेले. दाभा परिसरात सात वर्षीय मुलगा वंश विकास तिरपुडे हा कटलेली पतंग पकडण्याच्या नादात कारखाली चिरडला गेला. ६ जानेवारीला एंटा विनोद सोळंकी हा १२ वर्षीय मुलगा धावत्या रेल्वेखाली आला आणि मंगळवारी प्रणय ठाकरे याचा बळी गेला. या घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी रात्री १२ वाजता पोलीस जिमखाना येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांची बैठक बोलावली होती. ही बैठक जवळपास मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत चालली. बैठक नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असून विक्री व साठा  आणि  वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानंतर आज बुधवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग आणि पोलीस ठाण्यातील डीबी पथकाची बैठक घेऊन कारवाईचे आदेश देण्यात आले. या कारवाईनंतर पोलिसांनी शहरात धडक मोहीम राबवली. यात जवळपास ४५ जणांवर कारवाई करण्यात आली.

तरुणाचा जीव गेल्यावरही पतंगबाजांचा धुमाकूळ सुरूच

शहरात मंगळवारी एका युवकाचा मांज्याने गळा चिरल्याने मृत्यू झाला. ही घटना ऐकून  समाजमन सुन्न झाले. असे असतानाही बुधवारी पपतंगबाजांचा धुमाकूळ सुरूच होता. गुरुवारी मकरसंक्रांत असल्याने  तरुणांनी मोठय़ा प्रमाणात पतंगांची खरेदी केली. बुधवारीही दिवसभर शहरातील गल्लीबोळात पतंगबाजी सुरू होती. प्रशासनाने नायलॉन मांजावर कारवाईचा बडगा उगारला असला तरी ज्यांनी आधीच नायलॉन मांजा घेतला आहे त्यांना कसा आवरणार, हा प्रश्न कायम आहे. गांधीबाग, इतवारी, महाल, मस्कासाथ, इंदोरा, कळमना या दाट वस्त्यांमध्ये पतंगचा ज्वर शहराच्या इतर भागाच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे या भागात वाहन चालकांनी अतिदक्षता घेणे गरजेचे आहे. पतंग विक्रेत्यांनी देखील नागरिकांना नायलॉन मांजाच्या खरेदीपासून परावृत्त करणे अपेक्षित आहे. मात्र अजूनही नायलॉन मांजाची छुपी विक्री सुरू आहे.

न्यायालयाकडून दखल

नायलॉन मांजामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेकरिता अ‍ॅड. देवेन चौहान यांना न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्त केले असून उद्या गुरूवारी याचिकेवर सुनावणी होईल.

कठोर कारवाईचे आदेश

नायलॉन मांजामुळे अपघात होऊन लोकांचा मृत्यू होत आहे. त्यासंदर्भात मंगळवारी रात्री  व बुधवारी बैठक घेऊन कठोर कारवाईचे आदेश दिले. कुणालाही दयामाया दाखवू नये, असे बजावले. बुधवारी पोलिसांनी आपापल्या परिसरात पेट्रोलिंग करून विक्रेत्यांसह नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.