नूर मोहम्मदचे अनधिकृत वास्तव्य उघड होताच पोलीस दक्ष

नागपूर : अफगाणिस्तानचा नागरिक व तालिबानी समर्थक असलेल्या नूर मोहम्मदला ताब्यात घेतल्यानंतर शहरात वास्तव्यास असलेले पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि विदेशातील नागरिकांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही निवडक पत्रकारांशी बोलताना दिली.

नूर मोहम्मद हा २०१० मध्ये पर्यटन व्हिसा नागपुरात आला होता. या ठिकाणी तो नदीमसोबत दिघोरी नाका परिसरात राहायचा. नदीमने स्वत:चा बनावट आधारकार्ड व इतर दस्तावेज तयार करून घेतले. या आधारावर त्याने  जमीनही विकत घेतली. सुरुवातीला ते ब्लँकेट विक्रीचा व्यवसाय करीत होते. २०१७ मध्ये पोलिसांनी नदीमविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यावेळी नूर मोहम्मद पळून गेला असावा. जामिनावर सुटल्यानंतर नदीम फरार झाला. दरम्यान काल, बुधवारी पोलिसांनी नूर मोहम्मदला अटक केली. यावेळी त्याला केवळ सहा महिन्यांचा व्हीसा होता व तो २०१० मध्येच संपल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याने शरणार्थी असल्याचा दावा केला होता. तो दावाही फेटाळण्यात आला होता. यानंतरही तो भारतात राहात होता. तो तालिबानी दहशतवादी संघटनांचा समर्थक आहे. पण, त्याने भारतात काही कृत्य केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्याला भारतातून हाकलण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती  अमितेश कुमार यांनी दिली.  तसेच नागपुरात २ हजार ६०० पाकिस्तानी नागरिक, २६९ विदेशी नागरिक आणि ९६ अफगाणिस्तानही  आहेत. पर्यटन व्हीसावर आलेले व भारतात अनधिकृत राहात असलेले असे किती नागरिक आहेत, यातील शरणार्थी किती आहेत, याचा तपास करण्यासाठी त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.