टाळेबंदीमध्ये सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे काही गुन्ह्य़ांमध्ये घट झाली असली तरी घरफोडी व वाहनचोरीचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांत वाढले आहे. यावरून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीमध्ये रस्त्यावर बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांचे त्यांच्या मूळ  कार्यक्षेत्राडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होते.

करोनामुळे राज्यात १८ मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली. या टाळेबंदीत सर्व व्यवहार ठप्प झाले. उद्योगधंदे, कारखाने बंद पडले. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना बंद होत्या. त्यामुळे नाईलाजास्तव लोकांना घरातच राहावे लागले. इतर महिन्यांच्या तुलनेत या काळात गुन्हेगारी कमी झाली. पण, एप्रिल आणि मे महिन्यातील गुन्हेगारीचा अभ्यास केला असता टाळेबंदीतही मे महिन्यात घरफोडी व वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले. मार्च महिन्यात घरफोडीच्या ५२ घटना घडल्या. टाळेबंदीमध्ये या घटना कमी झाल्या व एप्रिलमध्ये  केवळ २२ घटना घडल्या. पण, त्यानंतर दुसऱ्या महिन्यात म्हणजे मे मध्ये टाळेबंदी लागू असताना व लोक घरी असतानाही यामध्ये वाढ होऊन ३२ ठिकाणी घरफोडीच्या घटना समोर आल्या. वाहनचोरीमध्येही अशीच वाढ नोंदवण्यात आली. एप्रिलमध्ये वाहनचोरीचे ३७ गुन्हे घडले असून मे मध्ये ४८ गुन्हे घडले. याचाच अर्थ लोक घरांमध्ये असतानाही वाहनचोरीच्या घटना घडल्या. या काळात पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत होते. त्यामुळे वस्त्यांमध्ये पोलिसांची गस्त कमी झाल्याने चोरटय़ांची हिंमत वाढली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.