गुन्हे शाखेत कामापासून अनेकांची माघार

मंगेश राऊत, नागपूर</strong>

गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करून आरोपींचा छडा लावण्याची जबाबदारी गुन्हे शाखेवर आहे. पण, गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखा वेगळ्याच समस्येमुळे त्रस्त झाली आहे. छोटय़ा-मोठय़ा बाबींकरिता कर्मचारी व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागण्यात येत आहे. या जाचाला कंटाळून अधिकारी व कर्मचारी नुसता त्रास ओढवून घेण्यापेक्षा काम न करण्यावरच भर देताना दिसत आहेत.

एकेकाळी गुन्हे शाखेच्या कामगिरीची सर्वत्र चर्चा होती. नीलेश भरणे, रंजनकुमार शर्मा आणि संभाजी कदम कार्यरत असताना गुन्हे शाखेने अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास केला. नीलेश भरणेंच्या कार्यकाळात दुसऱ्या शहरांमधील पोलिसांना न सापडलेले आरोपीही गुन्हे शाखेने पकडले व बाहेरही नावलौकिक कमावले. पण, सध्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. गुन्हे शाखेत संतोष आंबेकरशिवाय दुसऱ्या कोणत्याच प्रकरणाचा तपास होताना दिसत नाही.

गेल्या काही महिन्यांमध्ये पोलिसांनी उल्लेखनीय असा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याची कोणतीच कारवाई केली नाही. तसेच गुन्हे प्रकटीकरणाचा आलेखही खालावला आहे. यासाठी गुन्हे शाखेतील सध्याचे वातावरण जबाबदार असल्याची चर्चा

पोलीस वर्तुळात सुरू आहे. गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्वत:शिवाय कुणावरच विश्वास नसून प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने बघण्यात येत आहे.

एखादा अधिकारी व कर्मचाऱ्याने परस्पर तपास करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात येत आहे. अनेक अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र स्पष्टीकरण सादर करण्यात व्यस्त राहात असून काम करून नुसता त्रास ओढवून घेण्यापेक्षा काम न करण्याचेच धोरण त्यांनी अवलंबले आहे. कर्मचारीही गुप्त माहिती काढण्यासाठी शहरात फिरण्यापासून वाचत आहेत. एखाद्या गुन्हेगाराच्या सीडीआरमध्ये आपला क्रमांक दिसल्यास उगीचच निलंबित किंवा बडतर्फ होण्याच्या कारवाईपासून वाचण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कामावर जणू अघोषित बहिष्कार टाकला आहे.

‘त्या कर्मचाऱ्यावर’ नाराजी

गुन्हे शाखेत आकडेमोड व संगणक हाताळणीत एक कर्मचारी तरबेज आहे. या कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रचंड विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तो कर्मचारी अनेकांबाबत वाईट गोष्ट वरिष्ठांच्या कानावर टाकत असतो. यातून मत बनवून संबंधितांवर कारवाई होत असते. पण, संबंधित कर्मचारी गुन्हे शाखेतील पाच युनिटमधील प्रत्येक पथकाकडे चिरीमिरीची मागणी करीत असून  ती न मिळाल्यास संबंधितांविरुद्ध नकारात्मक माहिती वरिष्ठांच्या कानावर टाकत असल्याचा आरोप होत असून अनेकजण त्या कर्मचाऱ्यावर संतापले आहेत.

गुन्हे शाखेच्या कामाचा लवकरच आढावा 

गुन्हे शाखेतील कामगिरी खालावली असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही बाब लक्षात घेऊन लवकरच गुन्हे शाखेच्या कामगिरीचा व कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. कामगिरी उंचावण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांमधील नकारात्मक भावना दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

– डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त.