उपचाराकरिता डॉक्टरने टाळाटाळ केल्याने नातेवाईक संतप्त

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या अपघात विभागात उपचाराकरिता आलेल्या विषबाधेच्या रुग्णाला डॉक्टरांनी तपासणीकरिता टाळाटाळ केल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांकडून एका महिला निवासी डॉक्टरला शिवीगाळ करण्यात आली. नातेवाईकांनी येथे गोंधळ घातल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, डॉक्टरांकडून उपचारात हयगय करण्याबाबत नकार देण्यात आला.

मेडिकलच्या औषधशास्त्र विभागाची महिला निवासी डॉक्टर अपघात विभागात रात्री सेवा देत होती. रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास एक विषबाधा झालेले १८ ते २० वयोगटातील रुग्ण येथे उपचाराकरिता आला. डॉक्टरांना तातडीने रुग्णावर उपचाराची विनंती नातेवाईकांकडून करण्यात आली. मात्र, निवासी डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती चांगली असल्याचे सांगत थोडा वेळ नातेवाईकांना थांबण्यास सांगितले. मात्र, रुग्ण वेदनेने विव्हळत असल्याचे बघत संतप्त नातेवाईकानी  महिला डॉक्टरला  शिवीगाळ केली. दरम्यान, इतर नातेवाईकांनीही अपघात विभागात जमत गोंधळ घालणे सुरू केले. याप्रसंगी डॉक्टरकडून ही तक्रार सुरक्षा रक्षकांना केल्यावर त्यांनी मध्यस्थी करत नातेवाईकांना शांत केले.

महिला निवासी डॉक्टरने सुरक्षा यंत्रणेला दुसऱ्या दिवशी या नातेवाईकाला वार्डात प्रवेश न देण्याच्या सूचना केल्या होत्या, परंतु त्यानंतरही सोमवारी हा नातेवाईक वार्ड क्रमांक २३ मध्ये आला. त्याने येथेही परिचारिकांसह इतर डॉक्टरांसोबत वाद घातला.

वार्डातील कर्मचाऱ्यांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने या नातेवाईकाला पकडून शेवटी अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे मेडिकलमधील निवासी डॉक्टरांच्या मागणीवरून सुरू झालेल्या पास पद्धतीवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहे.