मारोतराव मुडे हायस्कूल येथील घटना

नागपूर : हुडकेश्वर येथील मारोतराव मुडे हायस्कूलच्या ३२ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी घडली. दुपारी भोजन घेताच विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना  शाळा प्रशासनाने मेडिकल येथे दाखल केले.  या प्रकारामुळे पुन्हा एकदा माध्यान्ह भोजनाचा विषय ऐरणीवर आला आहे.

आज दुपारी हुडकेश्वर हायस्कूलच्या २३३ विद्यार्थ्यांचे माध्यान्ह भोजन आले. यामध्ये बरबटीची उसळ आणि भात होता. शिक्षक विलास गजभे आणि विजय इडकर यांनी अन्नाची तपासणी केली. त्यानंतर ते विद्यार्थ्यांना देण्यात आले. मात्र अन्नसेवन करताच अर्ध्या तासानंतर एकापाठोपाठ एक विद्यार्थ्यांचे पोट दुखणे सुरू झाले तर काहींना मळमळ होऊन उलटय़ा होऊ लागल्या. ही बाब शिक्षकांच्या आणि शाळा प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांना जवळच्या खासगी इस्पितळात नेले. मात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने त्यांना मेडिकलमध्ये हालवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पालकांनी  मेडिकलमध्ये धाव घेतली. २० मुले आणि १२ मुली मेडिकलमध्ये दाखल आहेत. कोणाचीच प्रकृती चिंताजनक नसल्याचे  मुख्याधापक पांडुरंग लावरे यांनी सांगितले. शाळेत पारडी येथील शगुन महिला बचत गट तेथून भोजन पुरवठा होतो. घटनेची माहिती शगुन महिला बचत गटाला देण्यात आली.  परंतु अद्याप कुणीच आले नव्हते.  या बचत गटावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक करताहेत. सध्या या विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे.

भाजपच्या मर्जीतील गटांना कंत्राट

शगुन महिला बचत गटाला फडणवीस सरकारच्या काळात जून महिन्यात कंत्राट मिळाले होते. माध्यान्ह भोजन पुरवणारे असे नऊ महिला बचतगट असून ते सर्व भारतीय जनता पक्षाच्या मर्जीतले असल्याचे पालकांनी सांगितले. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. हे महिला बचत गट विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप मेडिकलमध्ये दाखल विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला.