|| मंगेश राऊत

अंमली पदार्थापेक्षाही धोकादायक :- अंमली पदार्थाच्या सेवनामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे आपण ऐकत असतो. पण, आता ‘पब जी’ या मोबाईल गेममुळेही अनेक शाळकरी विद्यार्थ्यांपासून मोठय़ा व्यक्तींचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. धरमपेठ परिसरातील एका शाळकरी मुलाला ‘पबजी’ गेमसाठी त्याच्या मित्रांनी धमकावले व ‘ब्लॅकमेल’ करून हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पीडित मुलगा हा नामांकित शाळेत नवव्या वर्गात शिकतो. काही वर्षांपासून त्याने ‘पबजी’ खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तो आई व वडिलांचा मोबाईल वापरायचा. वडील गर्भश्रीमंत असल्याने त्याला कधीच पैशांची चणचण भासली नाही. वडील, काका आदींकडून क्रीडा साहित्य खरेदी करण्याच्या नावावर तो हजारो रुपये मागायचा. एका मित्राच्या नावावर त्याने ऑनलाईन मोबाईल खरेदी केला. हा मोबाईल प्राप्त झाल्यानंतर त्याच मित्राने सर्वप्रथम त्याला ‘ब्लॅकमेल’ केले. मलाही मोबाईल खरेदी करून दे, अन्यथा तुझ्य़ा आईवडिलांना माहिती देईल, अशी धमकी त्याने दिली. अखेर मुलाने मित्राला २० हजारांचा मोबाईल खरेदी करून दिला. ही माहिती पीडित मुलाच्या इतर मित्रांनाही समजली. पीडित मुलगा आपला मोबाईल घरी घेऊन जात नव्हता. तो मोबाईल आपल्या मित्रांकडे ठेवायचा व शाळा, शिकवणी वर्ग बुडवून ‘पबजी’ खेळायचा.

पीडित मुलगा ‘पबजी’च्या आहारी गेला होता. प्रत्येक मित्र त्याला आईवडिलांना सांगण्याची धमकी देऊन मोबाईल विकत घेऊन मागू लागला. तो घरातून पैसे चोरून त्यांना मोबाईल विकत घेऊन देऊ लागला. एक दिवस वडिलांना घरातून पैसे गहाळ होत असल्याचा संशय आला. त्यांनी घरात चौकशी केली असता पीडित मुलाने आतापर्यंत लाखो रुपये मित्रांना दिल्याचे सांगितले. त्यांनी मुलाला ब्लॅकमेल करणाऱ्या इतर मुलांच्या पालकांना बोलवून घेतले. काही दिवसांपूर्वी धरमपेठ परिसरात मुलांची व त्यांच्या पालकांशी चर्चा केली असता सर्व पालकांनी मुले ‘पबजी’च्या आहारी गेल्याचे कबूल केले व यानंतर मुलांना सांभाळण्याची ग्वाही एकमेकांना दिली. त्यामुळे प्रकरण शांत झाले.

शस्त्र, पोशाख खरेदीसाठी लागतात पैसे

या खेळात शस्त्र व पोशाख खरेदी करण्यासाठी खाते असलेल्या व्यक्तीला रिचार्ज करावा लागतो. पहिला रिचार्ज १ हजार ७०० रुपयांचा आहे. ऑनलाईन अनेकजण एकाचवेळी गेम खेळत असल्याने आपला पोशाखही वेगळा ठेवण्यासाठी पैसे देऊन पोशाख खरेदी केली जाते. पीडित मुलाने आतापर्यंत हजारो रुपये अशा खरेदीवर उडवले. त्यासाठी मुलाने घरातून येण-केण मार्गाने पैसे मिळवले. नंतर चोरीही केली.

गुन्हेगारी मानसिकता तयार होण्याची भीती

या खेळात मुले आपल्या विरोधकांना बंदुकीने मारण्याचा प्रयत्न करतात. ऑनलाईन गेम असून अनेक शाळकरी मुले कानावर हेडफोन लावून सूक्ष्म आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांना मारण्याच्या सूचनाही देतात. ऑनलाईन गुण वाढवण्यासाठी माझ्य़ा मुलाने अनेक मित्रांना पैसे देऊन खेळायला लावले. चांगला खेळणाऱ्या मुलाला हजारो रुपयांनी लुटत गेला. हा धक्कादायक प्रकार असून लहान मुलांमध्ये गुन्हेगारी मानसिकता तयार  होत आहे. या खेळावर बंदी आणण्याची गरज आहे, अशा शब्दात एका पीडित मुलाच्या वडिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.