बुलढाणा : मालवाहू वाहनाच्या चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. उपस्थित नागरिकांच्या भीतीने त्याला दवाखान्यात भरती करण्याचा बहाणा करीत त्याला वाहनात टाकून अत्यावस्थ स्थितीत जंगलात फेकून दिले. यामुळे अपघातग्रस्त इसमाचा उपचाराभावी करुण अंत झाला.
माणुसकीला काळिमा फासणारी व क्रूरतेचे प्रदर्शन करणारी ही घटना जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासीबहुल परिसरात घडली.जळगाव जामोद पोलीस ठाणे हद्दीतील निमखेडी ते सुनगाव मार्गावर मालवाहू वाहन (क्रमांक एम एच २७ बी ५३८२ )च्या चालकाने दुचाकी (क्रमांक एम एच २८ एच ९१८९ ) ला धडक दिली. दुचाकीस्वार मनसाराम छत्तरसिंग वासकले (राहणार मेंढामारी) हा गंभीर जखमी झाला. यावर चालकाने गयावया करून जखमीला तातडीने दवाखान्यात नेतो अशी बतावणी केली. चालकाने त्याला वाहनामध्ये टाकले.
हेही वाचा…नागपुरात ॲसिड हल्ला; प्रेयसीने प्रियकराच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले
मात्र बुऱ्हाणपूर मार्गावरील शांतीलाल सस्त्या यांच्या शेतालगतच्या निर्मनुष्य जंगलात फेकून दिले. जखमीला उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान मृताचा भाऊ गमदास छत्तरसिंग वासकले यांनी जळगाव जामोद पोलिसात फिर्याद दिली. जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी चालका विरोधात कलम २७९, ३३७, ३०४, २०१ भांदवी सह १३४, १८६ मोटर वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यानंतर तपासचक्रे फिरवून आरोपी चालक योगेश सोपान महाजन (राहणार बोरसर ) यास शिताफीने अटक केली. ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एपीआय’ इंगळे , जमादार प्रेमसिंग पवार हे तपास करीत आहेत.