संस्थाचालकाचा दोन बहिणींवर अत्याचार; शहर बसने एकाला चिरडले; बुटीबोरीत क्षुल्लक वादातून खून

नागपूरकर गणरायांना निरोप देण्याच्या तयारीत व्यस्त असतानाच बलात्कार, खून, अपघातासारख्या गंभीर घटनांनी उपराजधानी हादरली आहे. या दुर्दैवी क्रमात एका संस्थाचालकाने दोन बहिणींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून कामठीत स्टार बसने एकाला चिरडले. तिकडे बुटीबोरीत क्षुल्लक वादातून खून करण्यात आला.

यातील पहिल्या घटनेत एका शिक्षण संस्थेच्या संचालकाने शेतावर काम करणाऱ्या महिलेच्या दोन मुलींवर तीन वर्षांपासून सातत्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, मुलींच्या आईनेच आपल्या मुलींना नराधमाच्या तावडीत दिल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी आरोपीसह मुलींच्या आईविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

अशोक जयस्वाल (५०) रा. स्वामी नारायण मंदिरजवळ, वाठोडा असे आरोपीचे नाव आहे. खरबीतील जयस्वाल इस्टेट, शांती पार्कमध्ये ईस्ट पॉईंट स्कूल असून आरोपी हा या शाळेचा संचालक आहे. वाठोडा परिसरात आरोपीची शेतजमीन असून त्या ठिकाणी फार्म हाऊस आहे. येथे एका महिलेला कामावर ठेवण्यात आले.  महिलेसोबत दोन मुली व एक मुलगा राहतो. आरोपी अशोक जयस्वालचे नेहमी फार्म हाऊसवर यायचा यातून त्याचे पीडित मुलींच्या आईसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. दोघांनी मिळून महिलेच्या पतीला पळवून लावले. दरम्यान, मुलींचेही वय वाढत होते व आरोपीची तिच्या मुलींवरही वाईट नजर होती.  २०१६ मध्ये एक मुलगी नवव्या वर्गात शिकत असताना आरोपीने तिला हैदराबादेत नेऊन तिला गुंगीचे औषध दिले व हॉटेलमध्ये बलात्कार केला. त्यानंतर तो नेहमीच तिच्यावर बलात्कार करायचा. मुलींची आईही त्याला मदत करायची. तिच्या दुसऱ्या मुलीलाही त्याने मुंबईला नेले होते. तेव्हापासून तो दोन्ही मुलींवर अत्याचार करायचा. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक स्नेहा जायभाये यांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

स्वयंपाकाच्या वादातून संपवले

स्वयंपाक करण्याच्या वादातून एका मजुराने दुसऱ्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून खून केला. ही घटना बुधवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. करण बाग (२३) रा. ओडिशा असे मृताचे, तर तिलकचंद्र चिरु बाग (२४) रा. ओडिशा असे आरोपीचे नाव असून त्याला पळून जात असताना गोंदिया रेल्वेॉस्थानकावर अटक करण्यात आली. बुटीबोरी परिसरात दत्त विद्या मंदिर शाळेच्या परिसरात वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर आरोपी व मृत काम करायचे. रात्री स्वयंपाक कुणी करायचा, यावरून दोघांत वाद झाला. यातून तिलकचंद्र याने लोखंडी रॉडने करणच्या डोक्यावर मारले. यात तो ठार झाला. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी पळून गेलेल्या आरोपीसाठी योजना आखली व रेल्वे पोलिसांच्या मदतीने गोंदियातून अटक केली.

पेट्रोल भरून परतताना अपघात

पेट्रोल भरून घरी परतणाऱ्या मोपेडस्वाराला भरधाव स्टार बसने चिरडले. ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागलोक प्रवेशद्वारासमोर दुपारी १.१५ वाजता घडली. सत्यनारायण पैडी (६५) रा. शिवकृपानगर असे मृताचे नाव आहे. सत्यनारायण पैडी हे आपल्या एमएच-४०, बीएम-७२६८ क्रमांकाच्या मोपेडने गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना एमएच-३१, सीए-६२१९ क्रमांकाची बस भरधाव नागपूरच्या दिशेने येत होती. त्यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व त्याने मोपेडस्वाराला चिरडले. स्थानिक लोकांनी त्यांना परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दुष्कृत्य असे उघडकीस आले

या त्रासाला कंटाळून तीन महिन्यांपूर्वी लहान पीडित मुलगी घरातून निघून गेली होती. तिला चाईल्ड लाईनद्वारे तपास करून शोधून तिच्या आईच्या हवाली करण्यात आले. परंतु ती आईकडे जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे फ्रिडम फर्म नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी मुलीचे समुपदेशन केले. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.