18 July 2019

News Flash

रामटेकचा गड : काँग्रेस ते शिवसेना

लोकसभा निवडणुकीचा इतिहास बघितला तर  १९५२ ते १९९९ दरम्यान सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारल्याचे दिसून येते.

(संग्रहित छायाचित्र)

मतदारसंघाचा मागोवा – रामटेक

नागपूर जिल्ह्य़ातील लोकसभेचा दुसरा मतदारसंघ म्हणजे रामटेक. राजकीयदृष्टय़ा हा नागपूरइतकाच महत्त्वाचा  आहे. देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे आंध्रप्रदेशातील पी.व्ही. नरसिंह राव यांनीही कधीकाळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे संसदेत नेतृत्व केले.

येथील लोकसभा निवडणुकीचा इतिहास बघितला तर  १९५२ ते १९९९ दरम्यान सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारल्याचे दिसून येते.

काँग्रेसने कोणताही उमेदवार द्यावा आणि रामटेककरांनी त्याला घसघशीत मतांनी निवडून द्यावे, असे येथील चित्र होते. त्यामुळेच आंध्रप्रदेशातील पी.व्ही. नरसिंह राव हे येथून दोन वेळा निवडून गेले.  पण, नंतरच्या काळात काँग्रेसची या मतदारसंघावरील पकड कमी झाली.  मतदारांना गृहीत धरण्याचे धोरण पक्षाच्या अंगलट आले आणि २००४ मध्ये शिवसेनेने काँग्रेसचा हा बालेकिल्ला सर केला. त्यानंतर २००९ चा अपवाद सोडला तर येथून सेनेनेच बाजी मारली. त्यानंतरच्या तीन निवडणुका सेनेने जिंकल्या. २००९ पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. सध्या शिवसेनेचे कृपाल तुमाने हे येथील खासदार आहेत.

नागपूर आणि अमरावती जिल्ह्य़ातील काही भागाचा समावेश या मतदारसंघात आहे.  काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर या संत्रा पट्टय़ातील तालुक्यांसह उमरेड आणि कामठी अशा एकूण  विधानसभेचे सहा मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. नागपूर शेजारी असल्याने या मतदारसंघावर नेहमीच नागपूरच्याच नेत्यांचा प्रभाव राहिला. नागपूरहूनच तेथील सत्तासूत्रे हलवली जात होती.

नागपूरचे खासदार राहिलेले दत्ता मेघे हे रामटेकमधूनही एकदा विजयी झाले होते. डॉ. श्रीकांत जिचकार यांनाही येथून निवडणूक लढण्याची संधी मिळाली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेकडून दोन वेळा खासदार म्हणून निवडून घेल्यावर सुबोध मोहिते यांनी सेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत रामटेककरांनी मोहितेंना नाकारून सेनेच्याच पदरात मतांचे दान टाकले होते.

निवडणूक आणि विजयी उमेदवार

१९५७     के.जी. देशमुख (काँग्रेस)

१९६२     एम.बी. पाटील (काँग्रेस)

१९६७     ए.जी. सोनार (काँग्रेस)

१९७१     राम हेडाऊ/ए.जी. सोनार  (काँग्रेस)

१९७७     जतिराम बर्वे (काँग्रेस)

१९८०      जतिराम बर्वे (काँग्रेस)

१९८४     पी.व्ही. नरसिंह राव (काँग्रेस)

१९८९    पी.व्ही. नरसिंह राव (काँग्रेस)

१९९१    तेजसिंहराव भोसले (काँग्रेस)

१९९६    दत्ता मेघे (काँग्रेस)

१९९८    चित्रलेखा भोसले (काँग्रेस)

१९९९    सुबोध मोहिते (शिवसेना)

२००४    सुबोध मोहिते (शिवसेना)

२००७   प्रकाश जाधव (शिवसेना)

२००९    मुकुल वासनिक (काँग्रेस)

२०१४   कृपाल तुमाने (शिवसेना)

First Published on March 14, 2019 1:00 am

Web Title: track of loksabha constituency in nagpur