तुकाराम मुंढे यांचा आणखी एक दणका

नागपूर :  अयोध्यानगर येथील एका डांबरी रस्त्याच्या निकृष्ट कामासाठी संबंधित एजन्सी अमृता कन्स्ट्रक्शनसह महापालिकेचे हनुमाननगर झोनचे कार्यकारी अभियंता अविनाश बारहाते, कनिष्ठ अभियंता लामसुंगे आणि उपअभियंता के.सी. हेडाऊ यांना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या रस्त्याचे त्रयस्थांकडून अंकेक्षण केल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. गेल्या आठवडय़ात  मुंढे यांनी सिमेंट रस्त्यांचे निकृष्ट बाधकाम आणि त्याच्या दिरंगाईसाठी कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांच्यासह जे.पी. इंटरप्राईजेस आणि क्रिएशन इंजिनियर्स या दोन कंत्राटदार कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

यानंतर आज शुक्रवारी तीन अधिकाऱ्यांसह अमृता कन्स्ट्रक्शन या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.  गेल्या काही दिवसांपासून विविध भागात सिमेंट रस्त्यांसह डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. अयोध्या नगर भागात प्रतापसिंह चव्हाण यांच्या घरापासून ते तडस यांच्या घरापर्यंत १२ लाख रुपये खर्च करून ३०० मीटरच्या रस्त्याचे काही दिवसांपूर्वी रुंदीकरण, डांबरीकरण करण्यात आले. मात्र डांबरीकरण करताना डांबर कमी टाकण्यात आले. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी आयुक्तांच्या जनता दरबारात तक्रार केली होती. त्याची दखल घेत आयुक्त मुंढे यांनी या रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या अमृता कंस्ट्रक्शन कंपनीसह संबंधित एजन्सी व तीन अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

अमृता कन्स्ट्रक्शनने या रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतर या कामाची त्रयस्थ खासगी संस्थेच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल व त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असेही त्यांनी निर्देश देण्यात आले. शहरातील डांबरी रस्त्यांची लवकरच त्रयस्थ खासगी संस्थेच्या माध्यमातून तपासणी होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात आणखी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची चिन्हे आहे.