गडकरींकडून सामाजिक दायित्व निधीतून व्यवस्था

नागपूर : शहरातील रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक दायित्व निधीतून शनिवारी विशाखापट्टणमच्या अटळे मधून दोन हजार प्राणवायू ‘कॉन्सन्ट्रेटर’ मागवले असून लवकरच ते नागपुरात  पोहचणार आहेत. याशिवाय सज्जन जिंदल यांनी २० टन प्राणवायू वहन क्षमता असलेले दोन टॅंकर्स पूर्ण वेळ नागपूरसाठी दिले आहेत. या टॅंकर्समुळे ‘भिलाई स्टील प्लांट’मधून रोज ४० टन प्राणवायू नागपूरला मिळणार आहे.

उपचाराअभावी आणि व्यवस्थेअभावी कोणत्याही करोना रुग्णाला जीव गमवावा लागू नये म्हणून गेल्या आठ दिवसांपासून गडकरी  प्राणवायूसह अन्य वैद्यकीय सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ‘मुंबई डॉल्बी प्लांट’च्या नितीन खरा यांच्याशी चर्चा केल्यानंतर खारा यांनी १००० रिकामे प्राणवायू सिलेंडर नागपूरला पाठवले आहेत. हे रिकामे सिलेंडर ‘भिलाई स्टील प्लांट’ला पाठवून ते पुन्हा भरून नागपूरला आणले जात आहेत.  ‘स्पाईस हेल्थ’च्या मालक अवनी सिंह यांच्याशी चर्चा करुन व्हेंटिलेटर्सची मागणी केल्यानंतर स्पाईस हेल्थ उद्या रविवारी १२५ व्हेंटिलेटर्स नागपूरला पोहोचते करणार आहे. व्हेंटिलेटरची आवश्यकता लक्षात घेता विशाखापट्टणम येथील एमपीझेड द्वारा निर्मित एक हजार व्हेंटिलेटर्स नागपुरात उपलब्ध केले आहेत.   तसेच स्पाईस जेटचे मालक अजय सिंह यांच्याशी फोनवरून चर्चा करून तातडीने आरटीपीसीआर चाचणी करणारे संच नागपूरला उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वर्धेत रेमडेसिविरचे उत्पादन होणार

रेमडेसिविरचा तुटवडा लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चार दिवस सातत्याने पाठपुरावा करून वध्र्याच्या  ‘जेनेटेक लाईफ सायन्सेस’ला ३० हजार वायल प्रतिदिन रेमडेसिविर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळवून दिली आहे. रेमडेसिविर तयार करणाऱ्या गिलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली होती. त्यातील एक कंपनी ‘लोन लायलंस’द्वारा जेनेटिक लाईफ सायन्स रेमडेसिविर इंजेक्शन तयार करेल. साधारण एका आठवडय़ात वध्र्यात रेमडेसिविरचे उत्पादन सुरू होईल आणि पंधरा दिवसांत ३० हजार वायल प्रतिदिन इंजेक्शन विदर्भातील सगळ्या जिल्ह्यात उपलब्ध होतील. यासाठी आवश्यक त्या सगळ्या परवानगी गडकरी यांनी मिळवून दिल्या आहेत.