ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांचे प्रतिपादन; जलसंवर्धनावरील राष्ट्रीय जल परिषद

नागपूर : राज्यातील पाण्याच्या परिस्थितीत आता बराच बदलघडून आला आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी राबवलेल्या मोहिमेतून सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. तरीही अधिकाधिक जमीन पाण्याखाली आणणे आणि गवताचे आच्छादन कायम राखणे, हे सर्वात मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाचे माजी महासचिव व ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी केले.

वूमेन्स एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित एलएडी महाविद्यालयातर्फे ‘जलसंवर्धनावरील राष्ट्रीय जल परिषद : शिक्षकांची भूमिका’ या विषयावर रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंट येथे ही परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पाणी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील मनोहर, प्राचार्या डॉ. दीपाली कोतवाल, उपप्राचार्या कल्पना धवड, राधिका येल्कावार उपस्थित  होते.

पाण्याचे संवर्धन आणि त्याचा योग्य वापर झाल्यास आर्थिक विकासालादेखील चालना मिळेल. कारण पाण्याचा प्रति क्युबिक मीटर वापर कशाप्रकारे होतो, यावरून आर्थिक यश मोजले जाते. त्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन जमले पाहिजे. पाणी वापराच्या सवयी बदलल्या तर आरोग्य, संपत्ती आणि आनंद या तिन्ही गोष्टी साध्य होतील, असे डॉ. माधव चितळे यांनी सांगितले. या देशात सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात बनली. त्याचा एकमेव उद्देश सिंचन होता, पण हा उद्देश केवळ २५ टक्केच पूर्ण झाला आहे. पाणी उपसा करण्याच्या नव्या तंत्रज्ञानामुळे पाण्याची पातळी प्रचंड खाली गेली आहे, असे प्रतिपादन सत्यजीत भटकळ यांनी केले. त्यामुळेच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि वरुड हे तालुके ‘डार्क झोन’ मध्ये गेले आहेत. श्रमदानाची परंपरा या देशाला आहे आणि आपण नेमके तेच विसरलो आहे. म्हणूनच पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकसहभागावर आधारित श्रमदान चळवळीच्या आधाराने या परंपरेला पुन्हा एकदा उजाळा देण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यंमधील ७५ तालुक्यातील चार हजार गावांपर्यंत ही चळवळ पोहोचली आहे. डॉ. प्रमोद येवले यांनी पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकातून डॉ. कोतवाल यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वंदना पाठक यांनी केले. डॉ. सुचिता इंगळे यांनी आभार मानले. परिषदेत पाणी सुरक्षा आणि प्रक्रिया, भारतातील पाण्याचे प्रश्न : आर्थिक-सामाजिक पैलू आणि शिक्षकांची भूमिका, जुनेवानी आणि अंबाझरी पाणी संवर्धन प्रकल्प या विषयांवर विविध सत्रांमधून मंथन करण्यात आले.

नेमके येथेच गणित चुकले

भारत हा उष्ण भूप्रदेशात मोडत असल्याने मोठय़ा प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यामुळे पूर्वीच्या काळात निमुळत्या तोंडाची किंवा झाकण असलेली भांडी वापरली जात होती. बादलीत पाणी साठवणे ही युरोपीय पद्धत आहे. पाश्चात्य देशातील पद्धती स्वीकारणाऱ्या भारताने त्याचाही स्वीकार केला. नेमके येथेच गणित चुकले, असे ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे म्हणाले.