लक्ष्मीपूजनदिनी ‘मेडिकल’चा उपक्रम

नागपूर : मेडिकल रुग्णालयातील रुग्णांसाठी बनणाऱ्या रोजच्या जेवणातील कडक चपाती, जाडा भातासह इतर खाद्यपदार्थ बघून बरेच रुग्ण रुग्णालयाऐवजी घरचेच जेवण पसंत करतात. परंतु गरिबांना या जेवणाशिवाय पर्याय नसतो. ते या जेवणाची स्तुतीही करतात. यंदा मात्र मेडिकल प्रशासनाने रुग्णांना  लक्ष्मीपूजनाची दिवाळी भेट म्हणून प्रथमच रुग्णालयात चपातीसह व्हेज पुलाव, कढी, सेवई खिरीसह इतर खाद्यपदार्थाची मेजवानी देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यातून रुग्णांच्या आजारपणाच्या वेदना कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

मेडिकल आणि त्याच्या अखत्यारित असलेल्या सुपरस्पेशालिटी या दोन्ही रुग्णालयातील जेवण हे मेडिकलमधील स्वयंपाकगृहात तयार होते. पूर्वी येथे रुग्णशय्यांच्या तुलनेत स्वयंपाकीसह इतर कर्मचारी पर्याप्त संख्येने उपलब्ध होते. कालांतराने येथील बरेच कर्मचारी निवृत्त झाल्यावरही येथे पदभरती झाली नाही. दुसरीकडे मेडिकल आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयांत खाटांची संख्या वाढल्याने रुग्ण वाढले. यामुळे भोजन तयार करण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे प्रशासनाने काही प्रमाणात पोळी बनवणाऱ्या यंत्रासह इतर अद्ययावत यंत्राची सोय करून यातून कमी मनुष्यबळात काम होईल अशी व्यवस्था केली. दरम्यान, येथील रुग्णांना सध्या रोज जेवणात भात, भाजी, चपातीसह भात अथवा खिचडी दिली जाते.

दरम्यान, दिवाळीच्या दिवशी रुग्णांना काही विशेष देण्यासाठी प्रथमच मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या दिवशी रुग्णांसाठी विशेष मेनू निश्चित केला आहे. त्यानुसार रुग्णांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चपाती, व्हेज पुलाव, कढी, आलू छोले भाजी, सेवई खीर, मधुमेही रुग्णांसाठी विशिष्ट भजी तयार करण्याचे ठरले आहे. त्यामुळे रुग्णालयात वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णांना आंशिक दिलासा मिळणार आहे. पूर्वी दिवाळीच्या दिवशी रुग्णांसाठी  एखादा गोड पदार्थ तयार करून  वेळ मारून नेली जात होती. परंतु आता या पदार्थाने रुग्णांचे दु:ख  कमी करण्याचा मेडिकलच्या अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.