नासुप्रपुढे आव्हान; कंत्राटदारांची मनमानी, निधीच्या अडचणी कारणीभूत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीला एक महिना शिल्लक असताना नासुप्रचे अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. त्यापैकी वर्षांनुवर्षे काही रखडलेले असून नजीकच्या भविष्यात ते पूर्णत्वास जाण्याची शक्यता धूसर आहे.

एकाच शहरात विकासाचे सरकारचे दोन प्राधिकरण नको म्हणून नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा निर्णय यापूर्वीच सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता अंमलबजावणीस अवघे काही दिवस उरले आहेत, पण नासुप्रच्या पाच-सहा प्रकल्पांचे काम विविध कारणांनी अजूनही प्रलंबित आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी कामे सुरू होऊन सुद्धा ती पूर्ण झालेली नाहीत. कुठे कंत्राटदाराची मनमानी, कुठे न्यायप्रविष्ट प्रकरणे, तर कुठे अपुरा निधी अशा एक ना अनेक अडचणी आहेत.

कामठी मार्गावरील ट्रान्सपोर्ट प्लाझा हा त्यापैकी एक प्रकल्प आहे. नासुप्रने २००२ मध्ये एका कंपनीशी करार केला. त्यानंतर २००३ मध्ये थोडे बांधकाम देखील आहे, पण हा प्रकल्प अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. वर्धमान नगरमध्ये पूनम मॉल परिसरात नाटय़गृह बांधण्याचा प्रस्ताव आहे.  दुकानांना मागणी नसल्याने कंत्राटदाराने कामे राखून ठेवली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वानुसार सभागृह बांधण्याचे काम थांबले आहे. वांजरा येथे बीओटीवर रुग्णालय उभारण्याची अद्याप प्रक्रिया सुरू आहे. के.डी.के. महाविद्यालयाजवळ सभागृह अवर्धट स्थितीत पडून आहे. याशिवाय भामटी येथे कम्युनिटी हॉल, बिडीपेठ येथे टाऊन हॉल आदी प्रकल्प प्रलंबित आहेतच.

बर्डीवरील बहुमजली वाहनतळ, महात्मा ज्योतीराव फुले, नैवेद्यम जलतरण तलावाची फेरनिविदा काढण्यात येईल, असे नासुप्रचे अधिकारी सांगत आहेत, परंतु वर्षोनुवर्षे अर्धवट प्रकल्प अंतिम टप्प्यात कधी येतील, याबाबतची अनिश्चितता दूर झालेली नाही.

ट्रान्सपोर्ट प्लाझा कंत्राटदाराला सर्व जमीन भाडेपट्टय़ावर हवी आहे, परंतु अशाप्रकारे नासुप्रची जमीन भाडेपट्टीवर देण्याचे करारात नाही. या मुद्यांवर तोडगा काढण्यात आला असून महिनाभरात काम सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. कंत्राटदाराने पूनम मॉल परिसरातील मोकळ्या जागेत सभागृह उभारून द्यायचे आहे, परंतु अनेक दुकानदार गाळे सोडून गेले आहेत. त्यामुळे यातील काही भागात निवासी गाळ्यांसाठी कंत्राटदाराने मागणी केली आहे. अशाप्रकारे गेल्या दहा-बारा वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकल्पात कंत्राटदारांनी नवीन मुद्दे उपस्थित करून काम पूर्ण केले नाही. त्याविरोधात नासुप्रने देखील कडक भूमिका घेतली नाही. आता नासुप्रचे सुरू असलेले सर्व प्रकल्प आणि प्रस्तावित प्रकल्प नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एनएमआरडीए) सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी एनएमआरडीएवर राहणार आहे. शहरात अविकसित अभिन्यास विकसित करणे आणि अवैध बांधकाम नियमित करून घेताना लोकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने नासुप्र बरखास्त करण्यात येत आहे.

सीताबर्डीवरील पार्किंग प्लाझासह सहा प्रकल्पांची फेरनिविदा काढण्यात येत आहे. तसेच जे प्रकल्प अपूर्ण आहेत, त्या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्यात येत आहे. कामठी मार्गावरील ट्रान्सपोर्ट प्लाझातील अडचणी दूर झाल्या आहेत. वर्धामाननगरात सभागृह विकसित करण्यात येणार आहे. तेथे निवासी गाळे काढण्याचा प्रस्ताव कंत्राटदाराने दिला आहे. त्यावर विचार सुरू आहे.’’  – डॉ. दीपक म्हैसेकर, सभापती, नागपूर सुधार प्रन्यास.