नागपूर:  शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याच्या दहा वर्षीय मुलीवर दोन वृद्ध गेल्या तीन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करीत होते.ही संतापदायक प्रकार धंतोली ठाण्यांतर्गत उघडकीस आला आहे. अखेर मुलीने आईला याबाबत सांगितले आणि प्रकरण पोलिसापर्यंत पोहोचले. धंतोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही वृद्ध आरोपींना अटक केली.

सुखराम उर्फ बाबू श्याम भोई (७०) आणि सुरेश नारायण उईके (६०), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पीडित मुलीचे आई-वडील मजुरी करतात. त्यांच्या शेजारी आरोपी वृद्ध सुखराम राहतो. तो नेहमी घरी येत होता. तो मुलीला जवळ घेऊन तिचा लाड करीत होता.

हेही वाचा >>>माकडाला झाडावर उलटे टांगून अनन्वित अत्याचार; वन्यजीवप्रेमींकडून कारवाईची मागणी

सुखरामचे वय लक्षात घेता त्याच्यावर दाम्पत्य संशय घेत नव्हते. त्याचाच गैरफायदा सुखरामने घेतला. गेल्या ३ महिन्यांपासून सुखराम मुलीला घरात एकटी असल्याचे बघून तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. तिला आपल्या घरी नेत होता. तेथे तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. त्याच्या या कृत्याबाबत सुरेशला समजले.

रविवारी सुरेशनेही मुलीला एकटे गाठून तिचे लैंगिक शोषण केले. दोघांच्याही कुकृत्याने घाबरलेल्या मुलीने आईला माहिती दिली. आई-वडिलांनी तिच्यासह पोलीस ठाणे गाठले. धंतोली पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करून घेतली. सहायक निरीक्षक कोपरे यांनी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. पोलिसांनी सेामवारी दोन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेमुळे परिसरात आरोपींविरुद्ध संतापाची लाट आहे. दोन्ही वृद्धांना वस्ती मान-सन्मान होता. मात्र दोघांनीही केलेल्या कृत्यामुळे कुटुंबियांनीसुद्धा रोष व्यक्त केला आहे.