|| महेश बोकडे

३१ ऑगस्ट २१ पर्यंतची स्थिती; अटल इक्यूबेशन केंद्राचे सहकार्य लाभदायी

नागपूर : देशात नवीन ‘स्टार्ट- अप’ उद्योग उभारण्यास इच्छुकांना मदतीसाठी केंद्र सरकारने २१ राज्यांत ५९ अटल इक्यूबेशन केंद्र तयार केले.  त्यांच्या सक्षमीकरणासाठी २२०.५५ कोटी रुपये दिले. या केंद्रांनी अनेकांना स्टार्ट- अप उभारणीसाठी  केलेल्या मदतीमुळे ३१ ऑगस्ट २१ पर्यंत देशात २,३२४ स्टार्टअप उद्योग सुरू झाले. यातील सर्वाधिक ‘स्टार्ट- अप’ उत्तर प्रदेशातील आहेत. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे.

 शासकीय नोकऱ्या मिळत नाही. त्यामुळे आजही बरेच तरुण स्वतङ्मचा उद्योग उभारण्यासाठी धडपडत असतात. परंतु अनेकांना त्यासाठी  कोणती प्रक्रिया करावी, आर्थिक वित्त पुरवठा कुठून मिळवावा, उत्पादनाचा दर्जा कसा वाढवता येईल, स्वामित्व हक्काचे काय, त्याची नोंदणी व इतर तांत्रिक माहिती कशी मिळवावी, हे कळत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी  केंद्र सरकारने अटल इनोव्हेशन मिशनच्या मदतीने देशात ५९ अटल इक्यूबेशन केंद्राला मंजुरी दिली. हे केंद्र सध्या केंद्र सरकारकडून निश्चित निकषातील विविध उद्योग, शैक्षणिक व इतर संस्था, विविध कंपन्यांमध्ये सुरू आहेत. अटल इक्यूबेशन केंद्राच्या सक्षमीकरणासाठी सर्वाधिक ३८.०७ कोटींची मदत कर्नाटकातील केंद्रांना मिळाली.  तामीळनाडूला २५.५८ कोटी, महाराष्ट्राला २३.४९ कोटी, गुजरातला १४.१५ कोटी, उत्तर प्रदेशला १२.२ कोटी, मध्य प्रदेशला १२.१६ कोटी रुपये मिळाले. या केंद्रांकडून मोठ्या संख्येने तरुणांना कौशल्य प्रशिक्षणासह स्टार्ट अप उभारणीसाठी  मदत केली गेली. त्यामुळे सर्वाधिक २५३  उद्योग उत्तर प्रदेशात, २४१ तामिळनाडू, २२६ कर्नाटक, २१५ महाराष्ट्र, १८५ दिल्ली, १५४ केरळसह इतरही राज्यांत कमी- अधिक संख्येने  उद्योग सुरू होण्यास मदत झाल्याचे माहितीच्या अधिकारातून भोपाळचे सामाजिक कार्यकर्ते आशिष कोलारकर यांनी पुढे आणले आहे.