नागपूर : सलग दुसऱ्याही वर्षी पावसाने दडी मारल्याने जलसाठय़ांवर परिणाम होऊन विदर्भात नागपूरसह इतरही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याची सुरुवात नागपूरपासून झाली असून मंगळवारपासून शहराला एक दिवसाआड (आठवडय़ातून तीन दिवस) पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने  घेतला आहे. १७ वर्षांनंतर प्रथमच ही वेळ आली आहे. ही कपात फक्त एक आठवडय़ासाठी असली तरी पाऊस लांबल्यास पाणी कपातही सुरूच ठेवली जाणार आहे. विदर्भातील  इतरही शहरांवर अशी वेळ येण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी पाऊस कमी झाला आणि यंदाही अद्याप पावसाने जोर धरला नसल्याने विदर्भातील धरणे अद्यापही भरली नाही. त्यामुळे या धरणांवरून नागरी भागाला होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होऊ लागला आहे.

तळाला गेलेल्या जलसाठय़ातून पाणीपुरवठा करणे महापालिका आणि नगरपालिकांना अवघड होऊ लागले आहे. नागपुरात तोतलाडोहच्या मृत साठय़ातून शहराला पाणी पुरवठा होत होता. तोही आता तळाला गेल्याने अखेर महापालिकेने मंगळवारपासून एक आठवडय़ासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.  त्यानुसार नागपुरात बुधवार, शुक्रवार आणि रविवार पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

तसेच २१ जुलै २०१९ पर्यंत नवेगाव खैरी तोतलाडोह परिसरातील पाऊस व जलसाठा तसेच कन्हान नदी पात्रातील पाण्याची उपलब्धता बघून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. ऐन पावसाळ्यात एक दिवस पाणी मिळणार असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

१७ वर्षांत प्रथमच अपुरा पाऊस

यावर्षी पाऊस १५ जुलैपर्यंत सरासरी पेक्षा २८ टक्के कमी झाला आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा होत असलेला गोरेवाडा तलाव, नवेगाव खैरी, तोतलाडोह धरणांची पातळी खालावली आहे. खैरी धरणात १५ जुलैपर्यंत १७२ मिमी पाऊस झाला. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत ५३६ मिमी पाऊस पडला होता. तोतलाडोह धरणात १५ जुलैपर्यंत १५८ मिमी पाऊस झाला. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत ३९४ मिमी पाऊस झाला होता. तोतलाडोह धरण  कोरडे पडले आहे.