लोकसत्ता टीम
चंद्रपूर: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एकीकडे शासन नवनवीन उपक्रम राबवीत आहे.तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक मिळत नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. निवेदनातून मागणी करूनही शिक्षण विभागाला जाग येत नसल्याने अखेर संतप्त पालकांनी चक्क कुलूप ठोकुन शाळा बंद केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
गोंडपिंपरी तालुक्यातील अडेगाव येथिल जिल्हा परिषद शाळेत १ ते ५ वर्ग असून विद्यार्थी संख्या ६६ इतकी आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ दोन शिक्षकाची नेमणुक करण्यात आली आहे.
आणखी वाचा-अमरावती, चिखलदरा, अकोल्यात बालमृत्यू वाढले
त्यापैकी एका शिक्षकाकड़े मुख्या ध्यापकाची जबाबदारी तर अन्य एका शिक्षकाकड़े अध्यापणाची जबाबदारी देण्यात आली. दोन शिक्षकांना एकाच वेळेस इयत्ता पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवीने अशक्य आहे. दोन शिक्षक दोन वर्गात शिकविण्यासाठी गेले तर इतर वर्गांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्याबोळ होतो आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी अन्य एका शिक्षकाची नेमणूक करावी या मागणीचे निवेदन शिक्षण विभागाला दिले. मात्र तीन ते चार दिवस लोटूनही शिक्षण विभागाला जाग न आल्याने आज शनिवारला संतप्त पालकांनी चक्क शाळेला टाळे लावले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे एक शिक्षक देण्यात यावा अशी मागणी ३ ऑक्टोबरला निवेदनाद्वारे केली होती. ५ ऑक्टोबरला शिक्षकाची निवड न केल्यास शनिवार ७ ऑक्टोबरला शाळा बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे आज शनिवार असल्याने सकाळी सात वाजता विद्यार्थी आणि ग्रामस्थ शिक्षकाच्या प्रतीक्षेत होते. मात्र मागणी केलेले शिक्षक उपस्थित न झाल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांनी चक्क कुलूप ठोकून शाळा बंद केली. जोपर्यंत शिक्षक येणार नाही तो पर्यन्त शाळा बंद ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.